गडचिरोलीत चातगाव दलमच्या सात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal gadchiroli

गडचिरोली :- नक्षली कारवाया सुरु आहेत तर दुसरीकडे नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणाचे सत्र सुरूच आहे. गत काही महिन्यापूर्वीही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते. तर आज सात कमांडर आणि उपकमांडरानी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आतापर्यंत अवघ्या ९ महिन्यात २३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

नक्षल चळवळीला मोठा हादरा देत चातगाव या छोट्या दलमच्या कमांडरसह एकूण पाच सदस्यांनी तसेच इतर दलमच्या दोन अशा एकूण ७ नक्षलवाद्यांनी बुधवारी सायंकाळी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात ३ महिलांंचाही समावेश आहे. त्या सर्वांवर एकूण ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि अजयकुमार बन्सल उपस्थित होते. नक्षली हिंसाचार, सहकार्य करत नाही म्हणून आपल्याच आदिवासी बांधवांचे खून, विकासात्मक कामात आडकाठी, महिलांवर होणारे अत्याचार अशा नक्षलवाद्यांच्या धोरणाला कंटाळून नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. आत्मसमर्पण करणारे सर्वच्या सर्व सातही जण गडचिरोली जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळालेले हे मोठे यश आहे.

राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), देवीदास उर्फ मनिराम सोनू आवला (२५), रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), अखिला उर्फ राधे झुरे (२७), शिवा विज्या पोटावी (२२), करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२), राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

यावर्षी १ जानेवारी ते ९ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान २३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात ३ डीव्हीसी, १ दलम कमांडर व १ उपकमांडरचा समावेश आहे. याशिवाय २१ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यात नर्मदाक्का व तिचा पती या नक्षलींच्या वरिष्ठ कॅडरमधील नेत्यांचा समावेश आहे. यामुळे नक्षल्यांचे मनोबल ढासळले आहे.