सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुटी चार दिवस लवकर सुरू होणार

Supreme Court

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court’s summer recess) नियोजित उन्हाळी सुटी चार दिवस लवकर सुरू करून ती दोन दिवस लवकर संपविण्याचे ठरविले आहे. वकील संघटनांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन सरन्यायाधीश  एन. व्ही. रमण यांनी दिलेल्या निर्देशांनुसार न्यायालयाचे अतिरिक्त प्रबंधक महेश टी. पाटणकर यांनी उन्हाळी सुटीचे नवे वेळापत्रक शनिवारी एका नोटिशीद्वारे जाहीर केले. त्यानुसार न्यायालयाची उन्हाळी सुटी  येत्या १० मेच्या सोमवारपासून सुरू होईल व सुटीनंतर न्यायालयाचे कामकाज २८ जूनच्या सोमवारपासून पुन्हा सुरू होईल.

न्यायालयाने वर्षारंभी जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार उन्हाळी सुटी  १४ मे ते ३० जून अशी होती. आधी उन्हाळी सुटी ४८ दिवसांची होती. आता सुधारित वेळापत्रकानुसार ती एकूण ५२ दिवसांची असेल. सुटीच्या वाढलेल्या चार दिवसांपैकी एक दिवस १३ नोव्हेंबरच्या शनिवारी काम करून भरून काढला जाईल. तरीही वर्षअखेरीस न्यायालयाच्या एकूण कामकाजाच्या दिवसांतील तीन दिवसांची तूट तशीच राहील.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button