शेतकरी आंदोलनाच्या तिढ्यात सुप्रीम कोर्ट मध्यस्थी करणार; समिती नेमण्याचा सरन्यायाधीशांचा विचार

Supreme Court

नवी दिल्ली :- मोदी सरकारने (Modi Govt.) केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्ली व परिसरात गेले तीन आठवडे सुरू असलेला शेतकरी आंदोलनाचा तिढा सरकार करत असलेल्या वाटाघाटींतून सुटण्याची शक्यता दिसत नसल्याने हा प्रश्न चर्चेतून सामोपचाराने सोडविण्यासाठी एक समिती नेमण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी दिले.

आंदोलनामुळे बंद झालेले रस्ते खुले केले जावेत यासाठी केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. राम सुब्रह्मणियन यांच्या खडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीशांनी हे सांगितले. केंद्र सरकारच्यावतीने काम पाहणार्‍या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सरन्यायाधीश न्या. बोबडे म्हणाले, मि. मेहता आमच्या मनात काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. हा तिढा लवकर सुटला नाही तर लवकरच तो राष्ट्रीय समस्येचे स्वरूप धारण करेल. (त्यामुळे) तो सोडविण्यासाठी आम्ही एक समिती नेमू. या समितीत भारतीय किसान युनियन व भारत सरकारचे प्रतिनिधी असतील. शेतकर्‍यांच्या इतर संघटनांनाही  आम्ही समितीत यायला सांगू.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : ६० लाख टन साखर निर्यातीवर केंद्राकडून अनुदान मिळणार

मेहता यांनी न्यायालयास सांगितले की, कृषिमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. केलेले कृषी कायदे रद्द करणार की नाही, एवढेच सरकारने सांगावे यावरच आंदोलक अडून बसले आहेत.

सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असे काहीही करणार नाही, याची खात्री बाळगावी, असे मेहता म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, हे तुम्ही आता सांगून काय उपयोग? त्यांचे नुकसान होत आहे, अशी त्यांनी धारणा करून घेतली आहे. ते ऐकणार नाहीत. त्यामुळे तुमची चर्चा पुन्हा निष्फळ ठरेल. तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांच्या संघटनांची नावे सांगा. आम्ही त्यांना आमच्यापुढे बोलावून घेऊ.

शेवटी खंडपीठाने केंद्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब व उत्तरप्रदेश सरकारांना नोटीस जारी केली आणि याचिकाकर्त्यांना याचिकेत दुरुस्ती करून आंदोलक संघटनांना प्रतिवादी करण्यास सांगितले. पुढील सुनावणी उद्या गुरुवारी ठेवण्यात आली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER