सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने मोदींवर उधळली स्तुतीसुमने

pm modi & MR Shah
  • पंतप्रधान सर्वात लाडके, लोकप्रिय व द्रष्टे नेते

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘ जनतेचे सर्वाधिक लाडके, लोकप्रिय, चैतन्यपूर्ण व द्रष्टे’ नेते आहेत अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एम. आर. शहा यांनी शनिवारी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. गुजरात उच्च न्यायालयास ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विषेश टपाल तिकिटाचे पंतप्रधान मोदींच्या अनावरण करण्याच्या व्हर्च्युअल कार्यक्रमात मोदींच्या आधी बोलणाºया न्यायाधीशांमध्ये मोदींची स्तुती करण्याची जणू स्पर्धा लागल्याचे जाणवले. न्या. एम. आर. शहा यांच्याप्रमाणेच गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. विक्रम नाथ व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मोदींची तोंड भरून स्तुती केली.

भाषणाला सुरुवात करतानाच न्या. शहा म्हणाले, ‘ गुजरात उच्च न्यायालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण सर्वा धिक लाडके, लोकप्रिय, चैतन्यमय व द्रष्टे नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होताना मला अभिमान व धन्यता वाटते.’ ‘आपल्या सर्वात लाडक्या पंतप्रधानांचे विचार ऐकण्यास सर्वच उत्सूक असल्याने मी आता जास्त वेळ घेत नाही’, असे सांगत त्यांनी मोदींवर आणखी एक स्तुतीसुमन उधळून भाषणाचा समारोप केला.

न्या. शहा मुळचे गुजरातचे आहेत. २२ वर्षे गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली व नंतर ते १४ वर्षे त्या न्यायालयाचे न्यायाधीश राहिले. त्यामुळे त्यांनी भाषणात गुजरात उच्च न्यायालयास आपली कर्मभूमी म्हटले. न्या. शहा सन २०१८ मध्ये गुजरातहून पाटणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून गेले तेव्हाही शपथविधी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख ‘मॉडेल आणि हीरो’ असा केला होता.

मुख्य न्यायाधीश न्या. नाथ हिंदीमध्ये केलेल्या प्रास्ताविकात म्हणाले की, मोदी अत्यंत नेकीने जबाबदारी पार पाडत असल्याने त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. देशाप्रती कर्तव्य बजावत असतानाच सुरक्षित विश्व निर्माण करण्याचे वचनही त्यांनी पूर्ण केले आहे.

‘माननीय पंतप्रधान मोदींच्या चैतन्यमय नेतृत्वाखाली आपल्या महान देशाने ‘विश्वगुरु’ होण्याच्या मार्गावर याआधीच वाटचाल सुरु केली आहे’, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले. आता निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. अरुण मिश्रा यांनी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयातच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात मोदींना ‘वैश्विक विचार करून स्थानिक पातळीवर कृती करणारा अलौकिक बुद्धिमत्तेचा चतुरस्त्र  नेता’ म्हटल्याने मोठा वाद झाला होता. हे वक्तव्य न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे आहे, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेने त्याचा निषेधही केला होता.

अजित  गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER