सनरायझर्सने कर्णधार बदलला, वाॕर्नरऐवजी विल्यम्सनकडे नेतृत्व

IPl - Maharashtra Today

आयपीएलमध्ये (IPL) खराब कामगिरी होत असल्याने सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपल्या नेतृत्वात बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपदावरून आॕस्ट्रेलियाच्या डेव्हिड वाॕर्नरला (David Warner) हटवून न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला (Ken Williamson) कर्णधार म्हणून नेमले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या रविवारच्या सामन्यासाठी परदेशी खेळाडूंच्या काॕम्बिनेशनमध्येही बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे. यंदाच्या सिझनमध्ये सनरायझर्सचा संघ आतापर्यंतच्या सहा सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकू शकला आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुध्दच्या पराभवानंतर वाॕर्नरने पराभवाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. त्यानंतर हा बदल झाला आहे. त्याच्या आधी त्याने दिल्ली कॕपिटल्सविरुध्द सुपर ओव्हरमध्ये गमावलेल्या सामन्यानंतर संघनिवडीबाबत आश्चर्यकारक भाष्य करताना म्हटले होते की, मनिष पांडेला संघात न खेळवायचा निवडकर्त्यांचा निर्णय अतिशय कठोर होता.

वाॕर्नरने सुपर किंग्जविरुध्दच्या सामन्यात 55 चेंडूत 57 धावांची खेळी केली होती पण त्या खेळीदरम्यान तो टायमिंग आणि मोकळ्या जागेत चेंडू काढत शकत नसल्याबद्दल नाराज दिसला होता. योगायोगाने त्याच सामन्यात मनिष पांडेने 46 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती आणि विल्यम्सनने 10 चेंडूतच 26 धावा केल्या होत्या. त्यामुळे सनरायझर्सने 171 धावांपर्यंत मजल मारूनही ते सात गड्यांनी पराभूत झाले होते.

या पराभवानंतर डेव्हिड वाॕर्नरने म्हटले होते की 55 चेंडूत 57 धावा ही माझी खेळी संथच होती त्यामुळे या पराभवाची जबाबदारी मी स्विकारतो. माझे फटके क्षेत्ररक्षकांकडेच जात होते आणि ही चीड येणारी बाब होती. फलंदाजीपुरता विचार केला तर मी माझा दोष मान्य करतो. मनिषने मात्र छान फलंदाजी केली. आणि शेवटी शेवटी केन विल्यम्सन व केदार जाधव यांनी वेगाने धावा वाढवल्या. पण तरी आम्ही आवश्यक धावसंख्येला कमीच पडलो पण शेवटी महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी इतर कुणालाही दोष न देता मी जबाबदारी स्विकारतो.

विल्यम्सनकडे दुसऱ्यांदा सनरायझर्सचे नेतृत्व आले आहे.याच्याआधी 2018 मध्ये वाॕर्नरवर बाॕल टॕम्परिंगमुळे बंदी आली होती त्यावेळी विल्यम्सननेच सनरायझर्सचे नेतृत्व केले होते आणि त्याने 17 सामन्यात 735 धावा करत सनरायझर्सच्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर 2019 मध्येही विल्यम्सनकडेही नेतृत्व होते आणि 2020 पासून वाॕर्नर कर्णधार बनला. विल्यम्सनने कर्णधार म्हणून आयपीएलच्या 26 पैकी 14 सामने जिंकले होते आणि 12 गमावले होते.

त्याआधी वाॕर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सचा संघ 2016 मध्ये आयपीएलचा विजेता ठरला होता आणि त्याने 17 सामन्यात त्यांच्यासाठी सर्वाधिक 848 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये वाॕर्नरचे फलंदाज म्हणून सातत्य चांगलेच राहिले आहे.

सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विल्यम्सन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता पण त्याने तीन सामन्यात 108 धावा केल्या आहेत. यात दिल्लीविरुध्दच्या टाय सामन्यातील नाबाद 66 धावांची खेळी आहे. याउलट वाॕर्नरने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांसह 193 धावा केल्या आहेत पण त्याचा स्ट्राईकरेट हा 110.29 असा फारच कमी आहे.

सनरायझर्सने नेतृत्वबदलाचा निर्णय जाहीर करणाऱ्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गेल्या बऱ्याच वर्षांपासून वाॕर्नरचा संघावरील असलेला प्रभाव पाहाता हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र अजून निम्मी स्पर्धा बाकी आहे आणि डेव्हिड संघाच्या यशासाठी मैदानावर आणि मैदानाबाहेरसुध्दा पूर्वीसारखेच योगदान देत राहील याचा विश्वास आहे.

पुढच्या सामन्यात वाॕर्नर खेळेल की नाही याबद्दल सनरायझर्स व्यवस्थापनाने काहीच म्हटलेले नसले तरी त्याला खेळविले जाण्याची शक्यता कमीच दिसत आहे. राजस्थान राॕयल्सविरुध्दच्या या सामन्यासाठी त्याच्या जागी जेसन राॕय किंवा जेसन होल्डरला खेळविले जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button