भारतीय युद्ध शास्त्र अभ्यासाची उपेक्षा झाली आहे- चारुदत्त आफळे

रत्नागिरी/प्रतिनिधी :- भारताचा इतिहास पाहिला तर युद्ध शास्त्र अभ्यासाची उपेक्षा झाली आहे अशी खंत ह.भ.प. आफळेबुवा यांनी चिपळूण येथील ‘रजपूतांची शौर्यगाथा’ या कीर्तनमालेतील पहिले पुष्प उलगडताना व्यक्त केली.

श्री स्वामी चैतन्य परिवाराने चिपळूण येथील कै.खेडेकर संकुलात आयोजित केलेल्या पाच दिवसीय कीर्तनमाला शुभारंभाच्या दिवशी आफळेबुवानी रजपूतांची शौर्यगाथा उलगडताना पूर्वरंगासाठी ‘असा साधुसंग घडो मजलागी’ हे तारकाश्रमस्वामी यांचे पद निरुपणाला घेतले. निरुपणाच्या ओघात समर्थ रामदास यानी विधवा महिलांसाठी केलेल्या कार्याची महती सांगितली. संत महिमा वर्णन करताना अरण गावचे संत सावतामाळी यांचा भक्त महिमा सविस्तर वर्णन करून पूर्वरंग संपविला.

मध्यंतरानंतर चिपळूण येथील सहगायक वरुण केळकर याने ‘अवघे गरजे पंढरपूर’ हे सादर केलेले पद रसिकांची दाद घेणारे ठरले. उत्तररंग सुरू असताना पुराणांमागील काळाचा इतिहास बुवांनी सांगताना कृत, त्रेता, द्वापार या युगानंतर कलियुगाचा कालावधी सुरुवातीपासून मिळत नाही असे नमूद करताना माहीत असलेला इतिहास इसवी सन पूर्व ३०० पासून मिळतो असे सांगितले.