वाईटपणा घेण्याचा हट्टही वाईटच

CM Uddhav Thackeray - Coronavirus Lockdown

Shailendra Paranjapeसगळेच मुसळ केरात, असंच म्हणावंसं वाटतंय. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि अजून काही दिवस कडक निर्बंध कायम ठेवावेत, अशी चर्चा झाल्याच्या बातम्या आल्यात. सध्या ७ ते ११ ही जीवनावश्यक वस्तुविक्रीसाठी असलेली परवनगी दुपारी २ पर्यंत वाढवावी; पण इतर प्रकारच्या दुकानांना सध्या परवानगी देऊ नये. राज्यात २१ जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याने तेथे निर्बंध शिथिल करणे अयोग्य होईल. त्यामुळे सरसकट निर्बंध शिथिल करणे चुकीचे ठरेल. सध्याचे निर्बंध किमान काही दिवस सुरू ठेवले जातील, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे याबाबतच्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलंय.

सगळेच मुसळ केरात, असं का म्हणालो ते आता या पार्श्वभूमीवर स्पष्ट करतो. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी दोन-तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन स्वतंत्र बैठका घेऊन राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दोन स्वतंत्र बैठका का, तर भांड्याला भांडी लागतात आणि फार वेळा लागलेली चांगलं नाही म्हणून. अजितदादांनी अलीकडेच मी जे काय आहे ते तोंडावर बोलणारा माणूस आहे, असं सांगून टाकलं. जयंत पाटील (Jayant Patil) कसे शांत आहेत हे सांगताना त्यांनी हे विधान केलं होतं.

आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्र बैठक घेतली आणि जे काय आहे ते… अजितदादा बोलले तर काय पंचाईतच व्हायची. कदाचित म्हणून त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली असावी. अजितदादा पडले धडाक्याने निर्णय घेणारे नेते आणि मुख्यमंत्री सगळंच सबुरीनं घेणारे आणि वाईटपणा घ्यायला तयार असलेले.

त्यामुळे आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा वाईटपणा घ्यायला सिद्ध होतील. तेव्हा आपण सर्वांनी निर्बंध काही दिवस तरी राहतील, याची तयारी ठेवावी, हेच चांगले.

वास्तविक, कोरोनाच्या विविध उपाययोजना राज्यव्यापी न करता विकेंद्रित पद्धतीने करायला हव्यात. पुण्या-मुंबईत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक होते आणि या दोन शहरांमुळे महाराष्ट्रानं प्रथमच बदलौकिक अनुभवला. हा बदलौकिक इतका मोठा होता की तो जागतिक पातळीवर इतिहासात नोंदला गेला आहे. मात्र असे असले तरी पुण्यात आज रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर गेलेला आहे. मृत्युदर दीड टक्क्याच्या आसपासच आहे. असे असताना ज्या २१ जिल्ह्यांत कोरोना कहर आहे तेथेच निर्बंध लावणे योग्य होणार नाही का? वास्तविक पुणे शहरात कोरोना कमी होत असताना आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना वाढत असताना पुण्यातही म्हणजे शहर आणि जिल्हा असे भेद करून निर्बंधांचा विचार व्हायला हवा.

विकेंद्रित पद्धतीने शिथिलीकरण करायचे तर कोरोना वाढत आहे, अशा २१ जिल्ह्यांत दुकाने खुली करू नयेत, हे योग्यच आहे. तिथे काय घ्यायचा तो वाईटपणा मुख्यमंत्र्यांनी जरूर घ्यावा. पण पुण्यासारख्या ठिकाणी इतर सर्व प्रकारची दुकाने सुरू करायला हवीत. बांधकाम क्षेत्राशी संबंधित मटेरियलची दुकाने यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. अर्थचक्राला गती केवळ बांधकाम क्षेत्र देतं का, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही.

पुण्यासारख्या ठिकाणी केवळ जीवनावश्यक वस्तुविक्रीच्या दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ अशी वाढवतानाच जीवनाच्या सर्व क्षेत्रातली दुकानं तेवढाच वेळ खुली ठेवायला हवीत. व्यापाऱ्यांनी यापूर्वीच निर्वाणीचा इशारा दिला आहे. १५ एप्रिलपासून दुकाने, व्यापार बंद आहे. आता सहन होत नाही, ही भावना त्यांनी मायबाप सरकारला कळवलेली आहे. त्यामुळे मी वाईटपणा घ्यायला तयार आहे, या त्यागाच्या मोहात अति न पडता तर्कशुद्ध निर्णय घ्यावेत किंबहुना लोकहिताचे सगळे निर्णय वैयक्तिक त्याग भोगापेक्षा तर्कावर आधारितच घ्यावेत; कारण आपण शिवसेना म्हणून आपण हिंदुत्ववादी असलात तरी आपली महाआघाडी सेक्युलर आहे.

शैलेंद्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button