
फ्रेंड्स ! तुम्ही म्हणाल ,हा काय प्रकार बाबा आणखीन ?रंग आंधळेपणा , रात आंधळेपणा माहीत होता किंवा कित्येकांना अंधत्वाच्या फार मोठ्या प्रश्नाला सामोरे जावे लागते .” डोळे असून आंधळे” असेही काही लोक असतात .कशाला आज तुमच्या माझ्यासारखे कितीतरी जण असे बरेचदा करतात. असं होतं की नाही बघा . आपल्या दररोजच्या शाळा-कॉलेजच्या किंवा ऑफिसच्या रस्त्यावर, आपल्या कॉलनीत कित्येक गोष्टी आपल्याला दिसत असतात .आपण त्याकडे बघतही असतो. पण मला कोणी म्हटलं की,” अगं, बहावा खूप सुंदर असतो .तो लाव पावसाळ्यामध्ये “मलाच क्षणभर कोणता बहावा ?कसा असतो? प्रश्न पडतो .मग कोणीतरी सांगतो,” अगं तुझ्या क्लिनिकच्या रस्त्यावर देशमुखांच्या बंगल्यासमोर आहे की ! “मग मी दुसऱ्या दिवशी बघते आणि माझी मलाच लाज वाटते. मी मनातल्या मनात स्वतःलाच म्हणते ,डोळे असून आंधळी दुसरं काय ? त्या झाडाकडे लक्षही नसते आणि त्याचे नाव पण माहीत नसते.
बरेचदा कोणीतरी एखाद्या दवाखान्याचा पत्ता सांगतो की ह्या ठिकाणी ऍडमिट केलेले आहे. आपल्याला ते नाव बघितल्या सारखा वाटतं. कुठेतरी वाचले खरे, पण नेमका कुठे ? आपण विचारतो. हे ही डोळे असून आंधळे पणच ! असे प्रत्येकाचेच थोड्याफार फरकाने होते. कधीतरी डाव्या उजव्या हाताने आपण नुसतीच एखादी वस्तू ठेवतो आणि शोधत राहतो .मग मुलांपैकी कुणीतरी ,अरे, हे काय म्हणून समोरच असलेली वस्तू उचलून दाखवत.
मी विचार करते की हे का होतं असेल ? तर आपल्या मनातील कामांची भलीमोठी यादी ! वर्तमाना पेक्षा भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमणं म्हणजे जिथे असतो तिथे नसणं. विनाकारण घेतलेला ताण, नकळत अकारण चिंता करण्याचा स्वभाव किंवा आजार त्याचबरोबर अतिविचार कुठल्याही गोष्टीवर या गोष्टींमुळे हे होऊ शकतं .त्याचबरोबर असंही होतं की आपल्याला जे खूप आवडत असतं ते कायम आपल्या मनात मागल्या बाजूला मनामध्ये असतं. किंवा माझ्यासाठी त्या वेळी जे महत्त्वाचं आहे तेही आपल्या मनात कुठेतरी असतं .नवीन गावांमध्ये शिफ्ट झालेली व्यक्ती बाहेर पडते तेव्हा सर्वप्रथम डेली नीड्सचे दुकान ,इस्त्री, गिरणी कुठे आहे ? हे तिला बरोबर दिसतं. फारच आवड असेल तर अरे वा ! वामन हरी पेठे इतक्या जवळ वाटतं. येथ पर्यंत तिच्या लक्षात असतं. पण तिथेच असणारे पेंट्स ,रंग रोड्स, अशा हार्डवेअरच्या दुकानाकडे तिचं लक्ष जाईलच असं नाही. कदाचित त्यावेळी तिकडे बघणार नाही. त्याचप्रमाणे वडाच झाड एखाद्या वेळी कुठे आहे हे स्त्रियांच्या लवकर लक्षात येत,अर्थात पूजा करत असतील तर, पण इतर झाडांकडे फार लक्ष जाणार नाही.
दिल्लीच्या वीरेन खन्ना यांनी 2014 मध्ये NDNS ची सुरुवात केली .32 वर्षीय वीरेन हे नॅचरल सोसायटी चालवतात .खरे तर पूर्वी त्यांनाही” वृक्ष अंधत्व” होते. त्यानंतर त्यांनी निसर्गाच्या सहवासात वेळ घालवायला सुरुवात केली हे काम एका फेसबुक पेज मधून सुरू केले. यासाठी सर्वप्रथम बघूया की नेमकं “वृक्ष अंधत्व” म्हणजे काय ? लोकांमध्ये असलेले वृक्ष अंधत्व दूर करण्यासाठी वीरेन मदत करतात. ते म्हणतात की आपल्यापैकी किती जणांची नजर झाडे पाहून त्यांच्या वर थांबते? किती लोक कार्यालयातून घरी येताना रस्त्यावर असलेल्या झाडांकडे लक्ष देतात ? त्यांच्या स्मरणात या झाडांची नावे तरी राहतात का ? लोक सहसा झाडं आणि वनस्पतीं कडे दुर्लक्ष करतात .आपल्या जवळचे, बागेतले एखादे झाड विकासाच्या नावाखाली कापलेले असते हे कुणाच्या लक्षातही नसते हे एक अंधत्वच आहे. त्याला “वृक्ष अंधत्व “असं त्यांनी म्हंटले आहे.
देशात रोज सरासरी 8,300 झाडे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तोडली जातात. परंतु या झाडांना वाचवण्यासाठी काय करावे लागते हेच लोकांना माहीत नसते. वृक्ष संवर्धनासाठी ची माहिती एकाच ठिकाणी मिळत नाही म्हणून विरेन यांनी पुढाकार घेऊन वृक्ष बाबतची सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करून त्यांनी आता “ट्री ॲप “ची निर्मिती केली आहे .त्यातून त्यांनी अनेक हजारो झाडे वाचवली आहेत .ते म्हणतात की फक्त दिल्लीच नाही तर बहुतांश शहरे काँक्रीटची जंगले झाली आहे. झाडांची नावं लहान मुलांसोबत वृद्धांना ही माहित नाहीत. अशी कित्येक मुले आहेत ज्यांनी कधी ही झाडाला हातही लावलेला नाही. अशांना दर आठवड्यात विरेन दिल्लीमध्ये निसर्ग भ्रमंती वर घेऊन जातात. शाळा-महाविद्यालयातील मुलांशी झाडांवर चर्चा करतात. सर्वांना झाडांना स्पर्श करून कडकडून मिठी मारायची प्रेरणा देतात. त्यामुळे झाडां सोबत नातं तयार होतं. सोबतच वृक्ष अंधत्वही दूर होतं असं त्यांना वाटतं. एवढेच नव्हे तर ते मुलांना झाडावर चढायला देखील शिकवतात.
हे सगळं बघितलं की वाटतं, की बरेचदा आपण कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं की या गोष्टींसाठी एव्हढे कार्य करावे लागेल . उदा. झाडावर चढायला सांगणे, झाडाला स्पर्श करणे यासारखे उपक्रम मुलांसाठी घ्यावे लागतात आहे. याला कारण आपापसातील प्रचंड स्पर्धा, धावणे, कामाचा प्रचंड व्याप, आणि केवळ भौतिक सुखसोयींनी असलेले महत्त्व.
या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रत्येकाला आठवेल, की या मुलांपेक्षा आपण लहानपणी किती झाडांशी परिचित होतो, कित्येक आठवणी झाडांशी संबंधित आहेत. माझ्या बाबतीत म्हणाल तर, माझा पूर्ण अभ्यासच घराच्या फाटकाजवळ, मोठ्या कन्हेराच्या झाडाखाली बसून झालेला. याशिवाय आमच्या बाजूच्या वाड्यात मागच्या बाजूला एक आजीबाई राहायच्या. एकदम टिपिकल गोष्टीतल्या आजीबाईंसारख्या. त्यांच्याजवळ टकळी असायची दोऱ्याची, पानाची चंची असायची, तोंडात एकही दात नव्हता ,त्यामुळे छान बोळक होतं. त्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाखाली बसून गोधड्या शिवत आणि एकीकडे आम्हाला गोष्टी सांगत. खूप मजा यायची. आणि त्याच कडू लिंबाच्या झाडाला दोर बांधून झोका असायचा. त्यावरही खूप मस्ती चालायची. लिंबोणी जमा करणे, आणि ते आंबे म्हणून विकणे. हाही खेळ असायचा.
आमच्या दोन घरांच्या मध्ये एक तगरीचे झाड होतं. खूप सारी फुले यायची त्याला. त्यावेळी चांदणीच्या फुलाचा गजरा पण लावायचो आम्ही ! (सजणे , नटणे याबाबत कुठलाच सेन्स नव्हता , असं आता वाटते ,पण फ्रेश आणि आनंद होता हे नक्की !) आणि महालक्ष्मीांना मोठे हार करणे हा पण आवडीचा उद्योग होता. प्राजक्ताचा सडा पडायचा,ती फुले वेचायची. शेजारी मोठ एक भोकराच झाडं होते,ती चिकट असतात, त्याच्यावर खूप मुंगळे ही असतात. परंतु त्याचं लोणचं खूप सुंदर असतं. त्यावरची एक आठवण म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोकिळा त्या झाडावर यायची. आणि एका घासामध्ये एक पूर्ण भोकर गिळायची , ही गंमत बघण्यासारखी होती. आमच्या अंगणात सुंदर बाग.
अप्रतिम अशी गुलाबाची फुलं, “मोतीया गुलाब”हा तर वैशिष्ट्यपूर्ण होता .खास आमची स्पेशालिटी म्हणा ना ! कंपाउंड वरून दिसणारी फुलं जाणारे येणारे मागे वळून बघत, तेव्हा कोण अभिमान वाटायचा ! त्याशिवाय डाळिंबाचे झाड, आणि डाळिंब सोलणारी ताई हे समीकरणच !ते काम नेहमी ताईकडे असायच. ती प्रचंड कामसू. आणि मी सगळं रेडीमेड खाणारी ! कारण सगळ्यांत लहान. जाई जुई चा मोठ्ठा मांडव. किती म्हणून आठवणी सांगायच्या. वृक्ष झाडं फुलं आणि त्यांच्या बरोबरीने वाढत जाणारे बालपण, यासाठी खूप मोठे भाग्य लागते हेच खरे ! हेच मुलांना मिळवून देऊन झाडां प्रति संवेदनशील करून “वृक्ष अंधत्व “दूर करणं एव्हढ आपण फक्त करू शकतो .ही ही नैसर्गिक देणगी आहे यासाठी फार काही पैसा लागत नाही .लागते ती फक्त इच्छा आणि आवड.
मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला