
सकाळी उठल्याबरोबर व्हाट्सअप एकदा बघून घ्यायचे ही माझी पद्धत. आणि मग वेळ होईल तेव्हा आवडलेल्या पोस्ट सविस्तर वाचायच्या. अशीच एक इंग्लिश पोस्ट माझ्याकडे आली. खूप आवडली. ती गोष्ट होती एका आईची ! लिहिली होती एका कवितेच्या स्वरूपात. मला आवडण्याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस पिढी पिढी मधील अंतर वाढते आहे. त्यांच्यातली तडजोड करताना किंवा त्यांची जीवनशैली, त्यांचे विचार, कामांचे स्वरूप बघतांना जुन्या पिढीच्या माणसांना बराच त्रास होत असतो,आणि हा प्रश्न अनेक लोकांसमोर असलेला बघायला मिळतो. म्हणजे जो खरं तर तो त्यांच्या स्वभावामुळे होत असतो. ( नवीन पिढीचा काहीच सहभाग नाही असे नाही) पण स्वतःचा कुठला स्वभाव हा त्रास निर्माण करत असेल बरं ? म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करण्याचे ठरवले.
तर अशीच एक आई होती. तुमची माझी असते तशीच ! पण एकदा ती खूप थकली .चिडचिड होत होती तिची छोट्या छोट्या गोष्टींवर ! इतकी की मुलांना ती खडूस वाटावी इतपत ! तशी ती नेहमीच आजारी असायची, पण एक दिवस…..! पण एक दिवस ती बदलली. कशी बरं ?
सहज एक दिवस बाबा म्हणाले,” मी तीन महिन्यापासून नोकरी शकतोय, पण मला काही मिळत नाहीये. मी काही मित्रांबरोबर बिअर घ्यायला जातोय.” आई म्हणाली,”बरं ! ठीक आहे. काहीच ताण नाही.”
भाऊ म्हणाला , “आई ,मी अतिशय कमी मार्क्स मिळवले आहेत विद्यापीठाच्या परीक्षेत. सगळ्या विषयात ! आईने उत्तर दिले कि ,ठीक आहे . तू ते नक्की भरून काढशील आणि जर चांगलं करू शकला नाही तर तु ते सेमिस्टर रिपीट कर पण ट्युशन लाव त्यावेळी.”
मुलगी म्हणाली ,”की आई मी कारचा एक्सीडेंट करून कारची नासधूस केली “. त्यावर आई म्हणाली, की “ओके बेटा ! तु आज कार शॉप मध्ये जाऊन ते त्याला किती पैसे घेतात ते बघ आणि नक्की कर. आणि तोपर्यंत बसने किंवा सबवे ने जा”. सून , आणि घरातील इतर मंडळी असाच काही सांगतात ,आणि त्याला ती अशी शांततेने का उत्तर देत राहते ते बघून सगळेजण एकत्र होतात. आणि त्यांना या प्रतिक्रियांची भीती वाटायला लागते. काळजी वाटायला लागते. त्यांना शंका वाटते की डॉक्टरकडे गेली असेल ,डॉक्टरांनी काही औषध दिली असतील चिंता सोडायची . पण आईने ती बहुतेक फार जास्त प्रमाणात घेतली असणार, त्यामुळे सगळे मिळून ठरवतात की आपण ती जे काही राग येऊ नये म्हणून की काय, मेडिसिन्स जास्त प्रमाणात घेते आहे. त्याचे जे काही व्यसन होतं आहे, त्यातून तिला वाचवण्याचा मुले ठरवतात , आणि आई भोवती गोळा होतात.
तेव्हा उलट त्यांना आई सांगते की , मुलांनो ,मला हे कळायला फार उशीर लागला की प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्यासाठी भरपूर जबाबदार असतो. मी यासाठी अनेक वर्ष घेतली की माझी चिंता ,माझं नैराश्य ,मला झोप न येण किंवा माझा ताण यामुळे तुमचे प्रश्न सुटणार नाहीयेत उलट मीच जास्तीत जास्त चिंतातुर होत जाते आहे.
मी तुमच्या कोणाच्या कृत्याला जबाबदार नाही आणि तुम्हाला आनंदी करण्याचे माझं कामही नाही. परंतु ही माझी जबाबदारी नक्की आहे की त्यावर मी कशी रिअॅक्ट होते. त्याच्यावर माझे तुमचे आणि सगळ्यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे. आई त्यामुळे मी या निर्णयाप्रत आले की माझी ड्युटी एवढीच की नेहमी शांत राहायचं आणि प्रत्येकाला त्याच्याशी संबंधित प्रश्न सोडवू द्यायचे.
खरं बघता मी अनेक योग, मेडिटेशन, व्यक्तिमत्व विकास मानसिक आरोग्य न्यूरो लिंग्विस्टिक असे अनेक प्रोग्राम्स ऐकले बघितले केले. या सगळ्याच सार फक्त हे आणि हेच आहे हे मला कळले. bमी फक्त मला कंट्रोल करू शकते तुमच्याजवळ सगळी नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे की ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकाल मग ते कितीही कठीण असेनात का. पण माझे कर्तव्य किंवा माझे काम एवढेच की मी त्यासाठी प्रार्थना करीन ,तुम्हाला प्रेम देईन आणि त्यासाठी प्रवृत्त करीन, प्रेरणा देईन. आणि तुम्ही !.. तुम्हीच तुमचे प्रश्न सोडवणार आहात .
मी आत्ता पर्यंत तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या म्हणून सांभाळत गेले, तुमचे सगळे अपराध त्याचे ओझे पाठीवर बाळगत गेले , चुकांना पाठीशी घातले, दुःखासमोर ढाल बनून राहिले, तुमच्या सुखांना न्याय देत राहीले, आणि प्रत्येक वेळेला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आणि प्रश्न सोडवता सोडवता थकत गेले. या क्षणापासून मी जाहीर करते की तुम्ही प्रत्येक जण हे स्वतंत्र आणि स्वावलंबी असे प्रौढ आहात !आईचं भाषण ऐकून सगळे स्थब्द झाले.
ही गोष्ट मला स्वतःला खूप आवडली. जेव्हा मी आजूबाजूला पाहते तेव्हा अनेक “आई “आपल्या मुलांमध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये अतिशय गुंतलेल्या दिसतात. त्यातून स्वतःचं स्वास्थ्य हरवतात. मुख्य म्हणजे त्यात त्या काहीही करू शकत नसतात. आणि हतबलता आणखीनच वाईट. त्यामुळे फक्त काळजी करणे, दुःख करणे, त्यांची जबाबदारी स्वतः सांभाळणे, हे त्या करून स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करतात. याचा त्यांना तर त्रास होतोच, आणि बरेचदा याचा मुलांनाही त्रास होतो.आधीच ते त्यांच्या प्रश्नामध्ये असतात,त्यात तुमची काळजी बघितली की त्यांना जास्त त्रास होतो,त्यापेक्षा जर विश्वास व्यक्त केला,तर ते पूर्ण प्रयत्नांनी समस्यांना उपाय शोधतात.
आई लोकांच्या अति काळजीने बरेचदा मुलेही परावलंबी होण्याची शक्यता खूप असते. कारण मुळात सगळ्यांनाच आळस थोडाफार असतोच. कुणीतरी सगळं काही सांभाळत आहे असं म्हटल्यावर, स्व:ताहून कोणी अंगावर जबाबदारी घेईल असं होत नाही. याला खूप सारे पैलू असतात. काही गोष्टी खडतर परिश्रम करून मिळालेल्या जास्त चांगल्या असतात. त्यातला आनंद ही खूप वेगळा असतो. ही संधी मुलांना मिळू दिली पाहिजे.
याचा अर्थ तुम्ही माया ममता सोडून द्या असं होत नाही. आम्ही कायम मागे आहोत. काही अडचण लागली तर ताबडतोब बोलवा ही खात्री मुलांना द्यायला हवी. असंही होतं की बरेचदा आई-वडिलांना त्रास नको म्हणून मुलं स्वतःची जबाबदारी स्वतः पेलत राहतात. पण म्हणून अस आपल्याला पूर्ण अलिप्त व्हायचंच नाही .दुरून लक्ष ठेवलं तरी सगळं काही अनुभवी नजरेला लक्षात येताच. त्यावेळी आवर्जून मदतीला जाता येत.
पण खरं म्हणजे सिनियर पिढीची जी “दोन पावसाळे जास्त पाहिल्याची” जाणीव असते ती स्वतःला स्वस्थ बसू देत नाही, चुकून किती चुका होतील. बरेचदा चुकातूनही शिकतील ना! आणि खरं सांगायचं तर खूपच कमी लोक,” दोन पावसाळे ” माध्यमातून शिकतात. सगळ्यांना फुलपाखराची गोष्ट माहिती असेल, एका कोशातून सुरवंटाची बाहेर पडण्यासाठी धडपड चालू असते. एका मुलाला की बघवत नाही. म्हणून तो त्याला कोषातून बाहेर काढतो. मदत करतो .परंतु या परिस्थितीत फुलपाखराला पंखामध्ये उडायचं बळ राहत नाही. मात्र दूसर्या एका कोषातूनही सुरवंट बाहेर यायला संघर्ष करत असतो, मी संघर्ष करता करता हळूचकन बाहेर येऊन तो सुळ sकन आकाशात झेपावतो. मतितार्थ लक्षात आलाच असेल, बरेचदा ओव्हर प्रोटेक्शन मुळे आपण मुलांना परावलंबी तर बनवत नाही ना ? दुबळे तर बनवत नाही ना? हेही बघायला लागतं.
एक आणखीन गोष्ट जाणवली. की दोन पिढ्यांमध्ये संसार करण्याबाबतचे विचारच खूप भिन्न आहेत. त्यामुळे सीनियर पिढी त्यादृष्टीने जर तरुण पिढीकडे बघेल तर तशा अपेक्षा केल्या जातील. आणि मग त्याचं टेन्शन तरुण पिढीला येईल, तर अपेक्षाभंगाचे दुःख मोठ्या पिढीवर ही येईल. आणि खडखडाट वाढेल. पण गरज नाही ना याची. एक व्यक्ती, प्रत्येक पिढी युनिक आहे ती आपल्या सारखाच विचार कसा करेल ? मुख्य म्हणजे त्यांच्या कामाचे प्रकार वेगळे, त्यांच्या वेळेचे जग वेगळे, त्यांचे प्रश्न वेगळे. त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तरच आपल्या लक्षात येईल.
प्रत्येक आईचे ममत्व याला आड येते हे निश्चितपणें मलाही पटतय. पण जेव्हा असं दिसत की जिथे सारखं नवीन पिढीच्या संसाराकडे सतत लक्ष दिल्या जाते, तिथे संघर्षाला खतपाणी मिळते. मला वाटतं की आज वानप्रस्ताश्रम या शब्दाचा अर्थ आपण खऱ्या अर्थाने जर समजून घेतला तर, आपण ज्याला आजकालच्या भाषेत “सेकंड इनिंग” म्हणतो, त्यात स्वतःला कुठल्यातरी कामांमध्ये, त्याचबरोबर एखाद्या छंद जोपासण्यात गुंतवून घेतले तर या आईच्या गोष्टी सारखी आपली गोष्ट होणार नाही. कारण तिच्याकडून आपण बराच बोध घेतलेला असेल. मुख्य म्हणजे आजकाल बऱ्याच सीनियर सिटीजन ची तब्येत अतिशय चांगली असते, त्यांनी ती प्रयत्नपूर्वक चांगली जोपासलेली असते. ही कौतुकाची बाब आहे. कधी त्यांचा उद्देश असतो की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा आपले कुणाला करावे लागू नये. फक्त याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्येत स्वस्थ असलेला माणूस उगीचच हात-पाय बांधून शांत नाही बसू शकत. आणि मग गंमत सुरू होते “चार-दोन पावसाळ्याची !” मग त्यापेक्षा आपलेच चार नवे वसंत ऋतु उपभोगायला काय हरकत आहे ? यावर्षी येणाऱ्या वसंत ऋतूच्या स्वागताला सज्ज होऊया !
मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला