सुभाष बाबूंवर झाडलेल्या तीन गोळ्या स्वतःच्या छातीवर झेलणाऱ्या साथीदाराची गोष्ट

Maharashtra Today

“तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा…” (Tum Mujhe Khoon Do Mai tumhe azadi dunga) सुभाष बाबूंचा हा नारा ऐकला तर आजही करोडो युवकांच्या मन, मनस्तकात चेतनेची लहर उठते. मग विचार करा सुभाष बाबूंचा(Subhash Babu) म्हणजेच नेताजींचा वावर ज्या काळात होता तेव्हा काय परिस्थीती निर्माण झाली असेल. ज्यावेळी सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. सैन्याच नेतृत्व केलं तेव्हा सैन्यदल किती भारावून जात असेल. नेताजींचे ध्यैर्यवान आणि सामर्थ्यशाली सैनिक त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार होते.

इंग्रजांना कोणत्याही परिस्थीतीत नेताजींचा बंदोबस्त करायचा होता. सुभाष बाबूंच्या ठिकाण्याचा पत्ता लागताच इंग्रज त्या ठिकाणावर हल्ला चढवायचे. म्यानमारच्या जंगलात सुभाष बाबू लपल्याची खबर मिळाल्यानंतर इंग्रज सैन्यांनं अचानक धावा बोलला. पण सुभाष बाबूंना कोणतीच हानी झाली नाही. कारण त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्या निजामुद्दीननं स्वतःच्या छातीवर झेलल्या होत्या.

निझामुद्दीन…. यांच खरं नाव सैफूद्दीन होतं. १९०१ला उत्तरप्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातल्या धक्वान गावात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी घर सोडून इंग्रज सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांच्या तोंडून त्यांनी ऐकलं की सैन्यातील भारतीय सैनिकांचा जीव वाचवण्यापेक्षा गाढवांचा जीव वाचवला पाहिजे. गाढवावर लादून त्यावेळी सैन्यांना धान्य पोहचवलं जायचं. हे ऐकून त्यांच्या स्वाभिमानाला तडा गेला. त्यांनी हे वाक्य उच्चारणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

सैफूद्दीन तिथून निसटले आणी ते थेट पोहचले सिंगापूरला. सुभाष बाबूंच्या सैन्यात ते सामील झाले. आणि स्वतःच नाव ठेवलं ‘निझामुद्दीन’. सुभाष बाबूंच्या वाहनाचे ते ड्रायव्हर होते. ही गाडी म्यानमारच्या राजानं त्यांना भेट दिली होती. १९४३ ते १९४४ पर्यंत त्यांनी म्यानमारच्या जंगलात लपून इंग्रज सरकारविरुद्ध लढाई लढली.

अशाच एका चकमकी दरम्यान झाडीतून डोकवणारी बंदूकीची नळी त्यांनी बघितली. नळीचा रोख सुभाष बाबूंच्या दिशेने होता. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी झेप घेतली. सुभाष बाबूंवर झाडलेल्या तीन गोळ्या त्यांनी झेलल्या. कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांनी त्यांच्या शरीरातून तिन्ही गोळ्या काढल्याचं निझामुद्दीन यांनी मुलाखतीत सांगितलं. ते वर्ष होतं १९४३.

या घटनेनंतर नेताजींनी निझामुद्दीन यांना ‘कर्नल’ ही उपाधी दिली.त्यांनी अनेक यात्रांमध्ये नेताजींना साथ दिली. आझाद हिंद सेनेच्या शेवटच्या युद्धापर्यंत ते आघाडीवर राहून लढत होते. आझाद हिंद सेनाचा लढा अर्ध्यात थांबला. नेताजींचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी रंगूनमध्ये एका बँकेसाठी ड्रायव्हरची नोकरी सुरु केली. १९६९ला ते घरी परतले.

घराचं नाव ठेवलं ‘हिंद भवन’ ज्याच्या छतावर तिरंगा नेहमी डौलाने फडकत असे. लोकांना अभिवादन करताना ते ‘जय हिंद’ असं नेहमी म्हणायचे. हा आझाद हिंद सेनेतला नियम होता जो त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनला. यावर कुणी प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचे, ‘जुन्या सवयी आहेत, सहज सुटत नाहीत.’ २०१७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER