शेअर बाजार गडगडला ६२३ अंक

- आंतरराष्ट्रीय परिणामांचा फटका

मुंबई : देशांतर्गत कमी झालेली मागणी, अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीची स्थिती, जागतिक स्तरावरील व्यापार युद्ध, गुंतवणुकीबाबत निर्माण झालेली साशंकता, या सर्व पार्श्वभूमीवर शेअर बाजारात संकटात आला आहे. मंगळवारी सेन्सेक्स तब्बल ६२३ अंक गडगडला.

जगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले आहेत. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक ६२३ अंकांच्या घसरणीसह ३७ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १८३ अंकांच्या घसरणीसह ११ हजारांच्या खाली आला आहे.

सेन्सेक्स सकाळी १७३ अंकांने उसळून ३७ हजार ७५५ अंकांवर उघडला. पण त्यानंतर विक्रीची लाट सुरू झाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. येस बँकेचे शेअर ५२ आठवड्याच्या नीचांकावर गेले.

असे सर्व असताना रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने मात्र ता दशकातील दुसरी सर्वात मोठी उसळी घेतली. १८ महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रिजवरील सर्व कर्जे फेडली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली, सौदी अरामको ‘आरआयएल’च्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील २० टक्के भागभांडवल खरेदीचीही घोषणा करण्यात आली. जिओ गिगाफायबरची सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आल्याने या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळे सर्व बाजार घसरलेला असताना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मात्र ९.७४ टक्के अर्थात ११३ अंकांची वाढ झाली.

सोमवारी बकरी ईद असल्याने देशातील प्रमुख शेअर बाजार बंद होते. याआधी शुक्रवारी शेअर बाजारात नियमित व्यापार झाला. शुक्रवारी सेन्सेक्स २५४ अंकांच्या उसळीसह ३७ हजार ५८१ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ७७ अंकांच्या झेपेसह ११ हजार १०९ अंकांवर बंद झाला होता.