५.७१ कोटी लोकांना देणार राज्य सरकार मोफत लस; पण सुरुवात १ मेपासून नाही

Rajesh Tope - Coronavirus Vaccine

मुंबई :- राज्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ५ कोटी ७१ लाख व्यक्तींना कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र लसींची उपलब्धता पुरेशी नसल्याने हे लसीकरण १ मेपासून सुरू होणार नाही असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांना सांगितले.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना १ मेपासून लस द्यावी असे निर्देश केंद्र सरकारने दिलेले होते. मात्र, राज्यात त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींची उपलब्धता नसल्याचे सांगत टोपे यांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. तथापि, येत्या सहा महिन्यांत ५ कोटी ७१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. दरमहिन्याला साधारणत: दोन कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोव्हॅक्सिन लस देणार की कोविशिल्ड याबाबत उत्सुकता असताना टोपे यांनी स्पष्ट केले की, कोव्हॅक्सिन कुपीमध्ये १० लाख आणि जूनमध्येदेखील १० लाखच उपलब्ध होतील. त्या तुलनेने कोविशिल्डची उपलब्धता मुबलक होऊ शकेल. त्यामुळे बव्हंशी कोविशिल्ड हीच लस दिली जाईल. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनव्यतिरिक्त रशियाकडून स्पुटनिक ही लस मिळविण्याचाही प्रयत्न केला जाईल आणि त्यात निश्चितच यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१८ ते ४४ या वयोगटासाठी कोव्हॅक्सिन सुरू होईल तेव्हा ते एकाच वेळी सगळ्यांना सुरू केले जाणार नाही. त्यात १८ ते २४, २४ ते ३५ आणि ३५ ते ४४ असे वयोगट केले जातील व जास्त वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाईल असे टोपे यांनी स्पष्ट केले. सहा महिन्यांत सर्वांनाच लस मिळणार असल्याने नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ४५ ते वरील वयोगटातील लसीकरण केंद्र हे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठीच्या केंद्रापेक्षा वेगळे असतील, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन वाढणार
राज्यात सध्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) आहे. तो १५ दिवसांसाठी वाढविण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. टोपे म्हणाले की, लॉकडाऊन वाढविण्याचे ठरले आहे, तो किती दिवसांनी वाढविणार, त्यासाठीची नियमावली काय असेल हा निर्णय लवकरच घेतला जाईल.

ही बातमी पण वाचा : लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कोविन व आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे नोंदणी कशी करावी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button