‘ऑक्सिजन, औषधांसाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार’ – राजेश टोपे

Maharashtra Today

मुंबई : राज्यातल्या विविध शहरांत कोरोना (Corona)रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होत असून गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital)झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे (Oxygen leakage) २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी थेट केंद्र सरकारला (Center Govt) साकडं घातलं आहे. ‘राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, त्यांच्या पाया पडायलादेखील तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, अशी कळकळीची मागणी राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत माहिती देताना टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याबाबतची चाचपणी सुरू आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, केंद्र सराकारकडून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू असून ती जर तातडीने झाली, तर त्याचा आपल्याला आधार मिळू शकतो. समुद्र किनाऱ्यावरचं राज्य म्हणून त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ही एक मोठी समस्या सध्या राज्यासमोर आणि संपूर्ण देशामोर उभी राहिली आहे.

केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राला दररोज २६ हजार रेमडेसिवीर मिळणार आहे. मात्र महाराष्ट्राची रूग्णसंख्या लक्षात घेता आणखी १० हजार रेमडेसिवीर इंजक्शनची आवश्यकता आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्यासमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात रोज १० हजार रेमडेसिवीरची कमतरता भासणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत प्रश्न सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रेमडेसीव्हीरबाबत तोडगा काढणे गरजेचं आहे. रेमडेसीव्हीर सात कंपन्या बनवतात. आदर पुनावाला यांनी सांगितली की त्यांचं पूर्ण प्रोडक्शन येत्या २४ मेपर्यंत केंद्राने बुक केलं आहे. त्यामुळे आपण सध्या ते विकत घेऊ शकत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राचा छळ का? जितेंद्र आव्हाडांचा रेमडेसिवीरवरून केंद्राला संतप्त सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button