रखडलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता होणार सुरू

Maharastra Bushan.jpg

महाराष्ट्र भूषण हा राज्य सरकारचा सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. मनोहर जोशी हे युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री असताना हा पुरस्कार सुरू करण्यात आला. पहिला पुरस्कार कोणाला जाहीर झाला माहितीय? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पण, तो त्यांनी विनम्रपणे नाकारला. ‘माझेच सरकार राज्यात आहे आणि मीच पुरस्कार घेऊ का?तसे करणे योग्य ठरणार नाही’ असे सांगत त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही. १९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला तो भाई अर्थात सुविख्यात साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना. खरेतर पुलं आणि बाळासाहेबांमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद होते पण तरीही युती सरकारने मन मोठे करत पुलंचा उचित सन्मान करण्याची भूमिका घेतली.

त्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुलंनी आपली वैचारिक मते मांडताना वादाला तोंड फोडले. त्यानंतर  धारावीतील एका पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘ जुने पुलं पाडून आता नवीन पुलं बांधण्याची गरज आहे’, असा टोला हाणत बाळासाहेबांनी उट्टे काढले होते. पुढे काही वर्षांनी पुलंची तब्येत बिघडली तेव्हा त्यांची आस्थेने चौकशी करण्यासाठी बाळासाहेब पुण्याला त्यांच्या घरी गेले व दोघांमध्ये चर्चाही झाली. वैचारिक मतभेदांपलिकडे जाऊन महाराष्ट्रात वैयक्तिक स्रेह जपला जातो याचे ते उत्तम उदाहरण ठरले. नागपूरच्या एका पुरस्कार प्रदान समारंभात तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना आमंत्रणच नसल्याने नाराजीनाट्य उद्भवले होते. डॉ.विजय भटकर, सचिन तेंडुलकर, डॉ.अभय बंग-राणी बंग, रतन टाटा, पंडित भीमसेन जोशी, रा.कृ.पाटील, डॉ.बाबा आमटे, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, डॉ.अनिल काकोडकर आदी दिग्गजांना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आला आहे.

पुलंनंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर, लिटिल मास्टर सुनील गावस्करसह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. २०१५ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि पहिलाच पुरस्कार जाहीर झाला तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना. अपेक्षेप्रमाणे त्यावरून वाद उद्भवला.विशेषत: काही संघटनांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे पुरस्कार प्रदान सोहळा हा राजभवनात केवळ दोनशे लोकांच्या उपस्थितीत आणि कडेकोट बंदोबस्तात करण्यात आला. त्यानंतर हा पुरस्कार पाच  वर्षे देण्यातच आला नाही.

आता हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीही स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष आहेत. तर सदस्यांमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर,  प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजपती बाबा कल्याणी, क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER