खलनायकीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा प्राण

Pran - Amitabh bachchan

एंट्रो- हिंदी चित्रपटांमध्ये खलनायक जितका तगडा असेल तितकेच नायकाचे रूपही सक्षमतेने पुढे येते. मग अगदी देव आनंद जरी नायक असला तरी चांगल्या खलनायकामुळे त्याने केलेले सर्व प्रयोग पटतात. प्राण अगदी असेच खलनायक होते. ते चित्रपटात असले की नायकालाही आपले नायकत्व सिद्ध करण्यास मजा येत असे. आपल्या अनोख्या खलनायकी अदांमुळे प्राण यांनी नायकांपेक्षा जास्त पैसे तर घेतलेच; ‘प्राण’ अशीही चित्रपटांच्या शीर्षकात स्वतःची वेगळी इमेज निर्माण केली. आणि ‘प्राण’ असे शब्द पडद्यावर आले की, प्रेक्षक टाळ्या वाजवत असत. असे भाग्य फार कमी कलाकारांच्या वाट्याला आले आहे.

आज त्यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर प्राण यांच्याशी भेट झाली तेव्हा खलनायक नव्हे तर चरित्र अभिनेता म्हणून काम करू लागले होते. त्यांच्याबरोबर बोलताना त्यांची पठाणी बोली आणि त्यांचा भरदार आवाज ऐकत राहावासा वाटत असे. जुन्या काळातील अनेक किस्से आणि त्यावेळच्या शूटिंगमध्ये आणि आताच्या शूटिंगमध्ये जाणवत असलेल्या फरकाबद्दल बोलत असत. परंतु त्यांनी आधुनिकता स्वीकारली होती. तंत्रज्ञान बदलते तसे सोयीही बदलतात असे ते म्हणत. जुन्या काळी स्टुडिओमध्ये सेंट्रली एसी नसायचा. गरम व्हायचे. अशा स्थितीतही ते शूटिंगच्या अगोदर दाढीमिशा आणि आपले पूर्ण कपडे घालून सेटवर उपस्थित राहायचे. गरम होत असल्याची तक्रार न करता शूटिंग करीत असत. अभिनयासोबतच हासुद्धा त्यांचा एक अनोखा गुण होता. जवळ-जवळ सहा दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आनंदी केले होते.

१२ फेब्रुवारी १९२० ला दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्राण यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केवलकृष्ण सिकंद सरकारी ठेकेदार होते. रस्ते आणि पूल बांधण्याचे काम त्यांची कंपनी करीत असे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राण आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागले. त्यांना अभिनेता नव्हे तर फोटोग्राफर व्हायचे होते. यासाठी त्यांनी फोटोग्राफीचे प्रशिक्षण देणा-या संस्थेत प्रवेशही घेतला होता. एक दिवस ते पानाच्या दुकानावर उभे असता लाहोरमधील प्रख्यात पटकथा लेखक वली मोहम्मद यांनी त्यांना पाहिले. अत्यंत देखणा दिसत असलेल्या प्राण यांना त्यांनी चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला प्राण यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु वलीसाहेबांनी सतत पिच्छा पुरवल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला. त्यांना पहिला चित्रपट मिळाला- यमला जट. १९४० मध्ये प्रदर्शित झालेला तिकीट खिडकीवर ब-यापैकी चालला. त्यानंतर अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये प्राण यांना काम मिळू लागले. तेव्हा लाहोरमध्ये पंजाबी चित्रपटसृष्टी असल्याने ते लाहोरला गेले. परंतु फाळणीनंतर ते पुन्हा मुंबईला आले आणि संघर्ष सुरू केला. चित्रपटांमध्ये चांगला खलनायक नाही ही बाब लक्षात येताच त्यांनी खलनायक होण्याचा विचार केला आणि त्यामुळेच बॉलिवूडला एक देखणा, क्रूर, पाताळयंत्री, विनोदी खलनायक मिळाला. १९५८ मध्ये आलेल्या ‘अदालत’ चित्रपटात त्यांनी खलनायक अशा पद्धतीने साकारला की, सगळीकडे त्यांचे नाव झाले. त्यानंतर चार दशके त्यांनी आपली ही इनिंग सुरू ठेवली.

प्राण यांना खलनायकाच्या रूपातून बाहेर काढण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न राज कपूर यांनी केला. ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्ये प्राणला चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी पडद्यावर आणले. परंतु तो काही प्रेक्षकांना आवडला नाही. सात वर्षांनी १९६७ मध्ये मनोजकुमार यांनी ‘उपकार’मध्ये प्राण यांना मंगलचाचाची भूमिका साकरण्याची संधी दिली आणि त्या भूमिकेचे त्यांनी सोने केले. त्यानंतर शहीद, पूरब और पश्चिम, बेईमान, संन्यासी, दस नंबरी अशा अनेक चित्रपटांमध्ये मनोजकुमार यांनी प्राण यांना चरित्र अभिनेता म्हणून पडद्यावर आणले. बॉलिवूडमधील सर्व मोठ्या नायकांना त्यांनी आपल्या खलनायकीने बेजार केलेले होते.

याच दरम्यान म्हणजे १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन म्हणून पडद्यावर आणणारा ‘जंजीर’ आला. प्रकाश मेहरा यांनी जंजीरची योजना तयार केली तेव्हा शेर खानच्या भूमिकेसाठी प्राण यांनाच घेण्यात आले होते. प्राण यांनीच प्रकाश मेहरा यांना अनेक नायकांनी नकार दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले होते. या दोघांची चित्रपटातील दोस्ती नंतर वास्तवातही कायम राहिली आणि दोघांनी अनेक चित्रपटही एकत्र केले. डॉन, मजबूर, कालियामधील त्यांच्या भूमिका आजही डोळ्यासमोर येतात. डॉनसाठी अमिताभला २.५० लाख तर प्राण यांना ५ लाख रुपये देण्यात आले होते. सुपरस्टार राजेश खन्नापेक्षाही ते जास्त पैसे घेत असत. प्राण यांना स्मोकिंग पाईप आणि वॉकिंग स्टिक जमा करण्याचा छंद होता.

४०० च्या आसपास चित्रपट केलेल्या या हरहुन्नरी कलाकाराच्या जीवनावर प्रख्यात पीआरओ बनी रुबेन यांनी ‘अँड प्राण’ हे पुस्तक लिहिले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘बरखुरदार’ हा शब्द अत्यंत स्टाईलमध्ये बोलणा-या या महान कलाकाराचा १२ जुलै २०१३ मध्ये इहलोकीचा प्रवास थांबला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER