
पुणे : रिअल इस्टेट किंग पुण्यातील बिल्डर (Pune-based builder ) आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले ( Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय ईडीने (ED) धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित (Amit Bhasale) याला ताब्यात घेतलं आहे. इतकंच नाही तर अमित भोसले यांना अधिक चौकशीसाठी पुण्यावरुन मुंबईला आणल्याचंही सांगण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली चौकशी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यानंतर ईडीचे पथक हे मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या.
मुलीलाही नोटीस?
अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आलं होतं. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला