परिस्थिती चिघळली, महाविकास आघाडी कोरोना हताळण्यात अपयशी का ठरते आहे?

Maharashtra Corona

राज्यात कोरोनानं हाहाकार माजवला असताना नाशिक दुर्घटनेनं कोरोनाची भीषणता अधोरेखित केलिये. रुग्णालय प्रशासनाबरोबरच आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची भीषण स्थिती आहे. त्या राज्यांमध्ये कोरोनामुळं होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण ही महाराष्ट्रात जास्त आहे. त्यामुळं महाराष्ट्रालाच कोरोनाचा विळखा इतका घट्ट का होतोय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.

राज्यात कोरोना (Corona) संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संचारबंदी आणि कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतरही करोनाचा आलेख खाली आलेला नसून दैनंदिन आकडे धडकी भरवणारे आकडे समोर येत आहेत.. गेल्या २४ तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या ६१ हजार ९११ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ % एवढा आहे. आज राज्यात ६७ हजार ४६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी

कोरोनाग्रस्तांचा आलेख काही केल्या खाली येतना दिसत नाहीये. राज्यात आजपर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८१.१५ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख २७ हजार ८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

नाशिकमधल्या घटनेमुळं हदरला महाराष्ट्र

महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यामुळं आरोग्य यंत्रणा हतबल झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तातडीनं १५०० मेट्रीक टन ऑक्सीजन तातडीनं पाठवला होता. या ऑक्सिजन पुरवठ्यानंतर सर्व सुरळीत झाल्याचं चित्र होतं पण नाशिकमध्ये मोठी घटना घडून आली. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकच्या लिकेजमुळे अतिशय दुःखद व मन हेलावणारी घटना घडली.

तब्बल दोन तास ऑक्सिजन पुरवठा लिकेजमुळं खंडीत झाला. यात २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजन टँक भरताना हे लिकेज झालं. देशभरातून या गोष्टीवर प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी घटनेवर दुःख प्रकट केलंय. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांनी देखील या दुर्दैवी घटनेबद्दल दुखी असल्याची प्रतिक्रिया दिलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश देत मृतकांच्या कुटुंबाना ५-५ लाख रुपये मदत जाहीर केलीये.

मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिकच्या दुर्घटनेबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. राजेश टोपे म्हणालेत, “नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुःखदायक असून त्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनाला शब्द अपुरे आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे.”

अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) म्हणाले नाशिक येथील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाला आज भेट दिली, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाहून अतिशय दुःख झाले. माझ्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी व आरोग्य मंत्रीजी सुद्धा उपस्थित होते. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

कोरोनाग्रस्तांचा आकडा होणार सात लाखांच्या पार!

आजच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांच्या जवळ पोहचली आहे. त्यात सर्वाधिक १ लाख २१ हजार २८४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई पालिका क्षेत्रात ८३ हजार ४५० अॅक्टिव्ह रुग्ण असून नागपूर (Nagpur) जिल्ह्यात हा आकडा ८० हजार १५५ इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ७८ हजार ४७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नाशिक जिल्ह्यात ४६ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी कमालीची वाढते आहे.

राज्याच्या आर्थिक राजधानीला देखील कोरोनानं विळख्यात घेतलंयय २४ तासांत नवीन ७ हजार ६५४ रुग्णांची भर पडली आहे तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ५३८ रुग्ण वाढले आहेत. राज्यात लॉकडाऊन हाच कोरोना रोखण्यासाठीचा एकमेव उपाय मानला गेला होता. निर्बंधही लादण्यात आले होते. तरी कोरोनाग्रस्तांचा आटोक्यात न येणारी संख्या चिंतेचा विषय असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button