मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ

CM Uddhav Thackeray

अहमदनगर : मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) काही लोक स्वतः प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत आहेत. सत्तेतून बाहेर पडल्याने ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कामावर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता खुश आहे. मात्र त्यांच्यावर होणारी एकेरी टीका कधीही शिवसेना (Shiv Sena) खपवून घेणार नाही. लोकशाही आहे त्यामुळे आंदोलन कोणीही करावेत, त्यास विरोध नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. अश्या वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल व शिवसेनेची ताकद दाखवावीच लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिला आहे. शिवसेनेच्या पक्ष बांधणीसह सभासद नोंदणीची कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

राजेंद्र दळवी पुढे म्हणाले की, भाजप काही नेते नैरश्यामधून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहेत. त्यांना अजूनही राज्यांमध्ये सत्तेवर येण्याचे स्वप्न पडत आहेत, परंतु हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून पुढील सत्ता देखील शिवसेनेची येणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना सध्या काही काम नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तेंव्हा ते समोर कोण आहेत हे बघणार नाहीत. शिवसेना आणि शिवसैनिक जशास तसे उत्तर कसे देतात याचा विसर भाजपवाल्यांना पडू नये, असा कडक इशारा दळवी यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER