
नाशिक : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून येत्या १५ एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. याला भाजपने विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
लॉकडाऊन (Lockdown), संचारबंदी सर्व काही आम्हाला हवे आहे. परंतु, तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम करू नका, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला सुनावले. जुलमी पद्धतीने कामकाज करता येणार नाही. अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीत नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. तुम्हाला वाटले म्हणून एसीमध्ये बसून जीआर काढला, असे होता कामा नये, असे दरेकर म्हणाले.
राज्यात आजपासून जमावबंदी
दरम्यान, राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहेत. तसेच नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लॉकडाऊन नसला, तरी नागरिकांना या नव्या निर्बंधांचे पालन सक्तीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला