अॅथलेटीक्सपंटूसाठी महापालिका आयुक्तांनी दिले सात पर्याय, पालकांनी व्यक्त केले समाधान

ठाणे :  दादोजी कोंडदेव स्टेडीअम अॅथलेटीक्सपटूंसाठी मिळावे या मागणीसाठी पालकांनी दोन दिवसापूर्वी आक्रमक पावित्र घेतला होता. परंतु सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अॅथलेटीक्सपटूंसाठी एक नाही तर तब्बल सात पर्याय उपलब्ध करुन दिल्याने या पालकांचा अनावर झालेला राग शांत झाला आहे. त्यामुळे केवळ दादोजी कोंडदेव स्टेडीअमची मागणी लावून धरलेल्या, पालकांना असे अनेक पर्याय मिळाल्याने शेवट मात्र चांगलाच गोड झाला आहे.

दादोजी कोंडदेव क्रिडागृह हे आता क्रिकेटसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे येथे अॅथलेटीक्स पटूंना सराव करण्याची संधीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तीन दिवसापूर्वी सेलीब्रेटी लीग दरम्यान पालकांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर आयुक्तांनी सोमवारी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी आयुक्तांच्या दालनात दुपारी दोन वाजता पालक, प्रशिक्षक यांच्याबरोबर आयुक्तांनी चर्चा केली. सुरवातीला काहीसे वातावरण गंभीर होते. परंतु एक एक करुन आयुक्तांनी तब्बल सात पर्याय पालकांसमोर ठेवल्याने पालकांनी टाळ्यांच्या गजरात आयुक्तांच्या या सातही पर्यायांचे स्वागत केले. यामध्ये दादोजी कोंडदेव क्रिडागृहात बॉन्ड्री बाहेर ग्रासमध्ये किंवा सिथेंटीक ट्रॅक उपलब्ध करुन देण्याची हमी त्यांनी दिली.

त्यानंतर साकेत येथील पोलीस ग्राऊंडवर तीन दिवसात रोलींग करुन, मोबाईल टॉयलेट, साहित्य ठेवण्यासाठी कन्टेनर, वीजेची सुविधा, सुनियोजीत वेळ याची सांगड घालून देण्याचे आश्वासन दिले. तसेच सिंथेटीक ट्रॅकची सुविधा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार करुन तत्काळ त्यानुसार येथे काम करण्यात येणार आहे. तर कळवा येथील नगरसेवक मुकुंद केणी यांच्या प्रभागातील ग्राऊंडचाही वापर करता येऊ शकतो, याचीही चाचपणी केली जाईल, शिवाय याच भागात जिल्हाधिकारी विभागाचीही एक जागा असून त्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात विशेष सरावासाठी कौसा येथील स्टेडीअमसुध्दा उपलब्ध करुन दिले जाणार असून त्याठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी विशेष बससेवा सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय येथील सिंथेटीक ट्रॅकवर सुरु असणारे मॉर्नीग वॉक बंद करण्याच्या सुचना त्यांनी संबधींत अधिका:यांना दिल्या.

याशिवाय घोडबंदर भागातील बोरीवडी येथील भुखंड पालिकेच्या ताब्यात आला असून, त्याठिकाणी क्लब हाऊस, अॅथेलीटीक्ससाठी सुविधा आदी योजना आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गरज पडल्यास तत्काळ अॅथेलीटीक्ससाठी सिंथेटीक ट्रॅक सुरु करण्याची हमीसुध्दा त्यांनी दिली. शिवाय हिरानंदानी इस्टेट भागातील ग्राऊंडही यासाठी उपलब्ध होऊ शकते का? याचाही अभ्यास केला जाईल. त्यानुसार मंगळवारी संघटनेचे पदाधिकारी, पालिकेचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक यांनी या जागांची पाहणी करुन ज्या काही सुविधा हव्या असतील त्यानुसार त्याचे प्रयोजन सांगावे तशा सुविधा दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयुक्तांनी अशा पध्दतीने सर्वच पर्याय खुले केल्याने पालकांनीसुध्दा समाधान व्यक्त केले.