महाराष्ट्राला कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

Rajesh Tope Coronavirus

रत्नागिरी :- जगभरातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच काय देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये असे वाटते; पण मनात भीती असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. दुसरीकडे शाळा सुरू होत असताना मुलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाही तर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचं निर्जंतुकीकरण करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र, आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. तसंच कुणीही कोरोनाला गृहीत धरू नये, सर्वांनी काळजी घ्यावी, स्वयंशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका: मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची  तयारी आहे का? रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरू करणार असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर मोफत टेस्टिंग सेंटरवरही जादा कर्मचारी आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन
दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीत गेल्या २४ तासांत तब्बल ७ हजार ५४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे.

दिल्लीची कोरोना परिस्थिती बघता मुंबईत नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे. नो मास्क, नो एंट्री ही मोहीम आपल्या सर्वांना कोरोनापासून वाचवू शकते. त्यामुळे सर्वांनी मास्क घाला, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER