समर्थ राष्ट्रउभारणीचे शिल्पकार डॉ. कलाम

Shailendra Paranjapeअग्नी  क्षेपणास्त्रानं अडीच हजार किलोमीटर अंतरावर दूर समुद्रात लक्ष्याचा वेध घेतला आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांना त्या क्षणी एक कविता सुचली. मूळ तमिळमधल्या कवितेचे इंग्रजीत भाषांतरही झाले आहे; पण त्याचा भावार्थ असा होता. कलाम त्या क्षणी म्हणाले होते…

`आज मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण होतेय. मी लग्न करणार नाही म्हटल्यावर, आपला वंश पुढे चालू राहणार नाही, म्हणून माझ्या आई-वडिलांना खूप वाईट वाटायचं. पण आज त्यांचा शक्तिशाली नातू बघून त्यांना खूप आनंद झाला असता.’

अग्नी या आंतरखंडीय क्षेपणास्त्राला आपला मुलगा मानणारे तरल मनाचे कवी आणि राष्ट्राला सामर्थ्याप्रत नेणारे द्रष्टे वैज्ञानिक, असा संगम डॉ. कलाम यांच्यामध्ये  होता. त्यांचा १५ ऑक्टोबर (October 15 BirthAnniversary) हा जयंतीदिन. राष्ट्राला समर्थ बनवण्याचा संकल्प आपापल्या परीने केला आणि थोडी कृती केली तरी त्यांना अभिवादन केल्यासारखे होईल.

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत नाग, पृथ्वी, अग्नी  अशी क्षेपणास्त्रे  विकसित करण्याचा कार्यक्रम दिला. आंतरराष्ट्रीय राजकारणात गरीब राष्ट्राला आणि दुर्बलाला किंमत नसते, हे ओळखून देशाला समर्थ राष्ट्र बनवण्याच्या दिशेने नेणारा राष्ट्रपती, अशीही डॉ. कलाम यांची ओळख आहे.

डॉ. कलाम बहुमिती व्यक्तिमत्त्व होतं. रुद्रवीणा वाजवणारे कलाम उत्तम कवीही होते. त्यांचं संवेदनशील मन त्यांच्या कवितेतून अलगदपणे कागदावर उतरलेलं आहे. त्यांनी त्यांचं जीवन अभ्यासातून, संशोधनातून आणि संवेदनशीलता जपत समृद्ध केलंच; पण राष्ट्रउभारणीतही मोलाचं योगदान देत ते राष्ट्रपती आणि भारतरत्नही झाले.

आयुष्यभर इदं न मम, अशा वृत्तीनं जगलेले डॉ. कलाम राष्ट्रपती झाल्यानंतरही साधेच राहिले. त्याआधी संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार असताना १९९० च्या दशकात ते संरक्षण संशोधन विकास संघटनेचे महासंचालकही होते. तेव्हा संरक्षण संशोधनविषयक प्रयोगशाळेच्या भेटीला देशभर कुठेही गेले की ते छोट्याशा सिंगल ऑफिसर क्वार्टरमध्ये  म्हणजे छोट्याशा खोलीत राहायचे.

हा साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला. अगदी राष्ट्रपतिपदावर असतानाही त्यांनी काही आदर्श घालून दिले. नवी दिल्लीत मोठमोठ्या नेत्यांच्या इफ्तार पार्ट्या होत, आजही होतात. तशीच एक मेजवानी राष्ट्रपती भवनातही होत असे. कलाम यांनी या इफ्तार पार्टीचा मेजवानीचा खर्च टाळून गोरगरिबांना अन्नवाटप करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या अमलात येतील, हेही पाहिलं.

राष्ट्रपती भवनाच्या आवारात राहणाऱ्या सेवकांच्या मुलांमध्ये सहजपणे जाऊन क्रिकेट खेळून त्यांना बॉलिंग करणारे कलामही आपल्या राष्ट्रपती भवनाने पाहिले आहेत. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक करताना दिसलेल्या जखमी मोरावर रुग्णालयात उपचार होतील, याची काळजी घेऊन त्या मोराला परत निसर्गात सोडल्यावर लहान मुलाचा आनंद चेहऱ्यावर वागवणारेही राष्ट्रपती डॉ. कलामच होते.

पदाचा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना पदाच्या काळात मिळालेली स्मृतिचिन्हे, वस्तू या तेथेच सोडून जाणारे कलाम आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहिलेत. त्यांचा कार्यकाळ संपताना अगदी शेवटच्या काही दिवसांत त्यांच्या सख्ख्या भावाचे कुटुंब म्हणजे त्यांचे सख्खे बंधू, त्यांची मुलं, नातवंडे, पतवंडे हे  सारे राष्ट्रपती भवन बघायला आले होते.

एरवी राष्ट्रपतींचे पाहुणे म्हटलं की त्यांची खाशी बडदास्त ठेवली जाते. पण कलामांचे पाहुणे म्हणून त्यांची विशेष बडदास्त तर राहोच; पण सख्ख्या भावाच्या कुटुंबासाठी कलामांनी राष्ट्रपती भवनचे किचनही वापरले नाही. त्याऐवजी सरवण भवन या चेन्नईच्या सुप्रसिद्ध साखळी हॉटेलचं जेवण आणि न्याहारी सात दिवस मागवली होती आणि त्याचं बिलही स्वतःच्या वेतनातून दिलं होतं.

साधी राहणी, उच्च विचारसरणी हे जीवनाचं सूत्र असावं, असं लहानपणी आम्हाला शिकवलं जायचं. हे जीवनाचं सूत्र अखेरपर्यंत अंगीकारणारे डॉ. कलाम आमच्या पिढीला बघायला मिळाले, हा शुभयोगच म्हणायला हवा. कलाम यांना जयंतीदिनी (१५ ऑक्टोबर) अभिवादन.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

ही बातमी पण वाचा : भेदरलेले तळीराम अन् मेणबत्ती मोर्चा…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER