निवृत्त होताना माझ्या मनात शक्य ते सर्व केल्याचे समाधान

Sc - Sharad Bobde - Maharastra Today
Sc - Sharad Bobde - Maharastra Today
  • न्या. शरद बोबडे सरन्यायाधीशपदावरून निवृत्त

नवी दिल्ली : शक्य होईल तेवढे चांगले केल्याचे समाधान मनात ठेवून मी तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहे, असे सांगून भारताचे ४७ वे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे, उणीपुरी १७ महिन्यांची कारकीर्द संपवून शुक्रवारी त्या पदावरून निवृत्त झाले. मी सरन्यायाधीशपदाची सूत्रे न्या. रमण यांच्याकडे सोपवीत आहे. ते या न्यायालयाचे समर्थपणे नेतृत्व करतील, याची मला खात्री आहे, असेही न्या. बोबडे म्हणाले.

प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश शुक्रवारी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी भावी सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण यांना खंडपीठावर सोबत घेऊन बसले. न्या. बोबडे, न्या. रमण, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या या विशेष खंडपीठापुढे मावळत्या सरन्यायाधीशांना छोटेखानी औपचारिक निरोप समारंभ झाला.

अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांच्यासह उपस्थितांची निरोपाची भाषणे झाल्यानंतर उत्तर देताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, मी आनंदाने न्यायालयाचा निरोप घेत आहे, हे मला जरूर सांगावेसे वाटते. निरोप घेताना माझ्या मनात युक्तिवादाच्या, उत्तम सादरीकरणाच्या, सद्वर्तनाच्या आणि केवळ सहकारी न्यायाधीशबंधू व वकीलवर्गच नव्हे तर सर्वच संबंधितांच्या कामाप्रती दृढ निष्ठेच्या असंख्य हृद्य आठवणी आहेत.

न्या. बोबडे म्हणाले की, आज शेवटच्या दिवशी माझ्या भावना उचंबळून आल्या आहेत. याआधी निवृत्त होणार्‍या सरन्यायाधीशांसोबत न्यायपीठावर मीही बसलो होतो. पण आज माझ्याच निवृत्तीच्या वेळी मनात भावनांची एवढी गर्दी उसळली आहे की, काय बोलावे हेही सुचत नाही. २२ वर्षे न्यायाधीश राहिल्यानंतर मी निवृत्त होत आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयातील माझा अनुभव सर्वांत जास्त संपन्न करणारा आहे. सर्व सहकारी न्यायाधीशांनी दाखविलेला बंधुभाव तर वाखाणण्याजोगा होता.

कोरोना महामारीच्या काळातही न्यायालय पूर्णपणे बंद होऊ न देता ते ‘व्हर्च्युअल` पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जे अपार कष्ट घेतले, त्याचे त्यांनी खासकरून कौतुक केले. विनोदाच्या स्वरात न्या. बोबडे म्हणले की, ‘व्हर्च्युअल’ सुनावणीची चांगली बाब म्हणजे ती अगदी घरगुती वातावरणात झाल्यासारखे वाटते. त्यामुळे वकिलांच्या कार्यालयात भिंतीवर टांगलेली सुंदर चित्रे, शिल्पे व प्रसंगी बंदुका आणि पिस्तुलेही पाहायला मिळतात. त्या सर्व वस्तू आता चांगल्या परिचयाच्या झाल्या आहेत.

सरन्यायाधीशांना प्रेमाचा निरोप देताना अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांनी खासकरून कोरोना महामारीने हाहाकार माजविलेला असताना सर्वोच्च न्यायालयाचे काम बंद न पडू देण्यासाठी न्या. बोबडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मार्चमध्ये अशी अवस्था होती की, न्यायालय बहुधा सुरू होणार नाही, असे आम्हा वकील मंडळींना वाटले होते. पण सरन्यायाधीश बोबडे यांनी धीरोदात्त भूमिका घेत ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने सुनावणीचे काम सुरू केले. अशा पद्धतीने ५० हजारांहून अधिक प्रकरणे निकाली निघाली; ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे.

प्रत्येक सरन्यायाधीशांना निरोप देताना मन भरून येते. मनात असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करता याव्यात यासाठी त्यांना किमान तीन वर्षांचा कालावधी मिळायला हवा, असे मला नेहमीच वाटत आले आहे व आजही माझे तेच म्हणणे कायम आहे, असेही वेणुगोपाळ म्हणाले.

अ‍ॅटर्नी जनरलनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत होत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सरन्यायाधीश बोबडे केवळ कुशाग्र आणि बुद्धिमान न्यायाधीश म्हणूनच नव्हे तर एक प्रेमळ आणि सहृदयी माणूस म्हणूनही ओळखले जातील. त्यांची उणीव जाणवत राहील. त्यांना भावी आयुष्यासाठी खूप सदिच्छा.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ वकील विकास सिंग आणि ‘सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड’चे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनीही समयोचित भाषणे करून न्या. बोबडे यांना शुभेच्छा दिल्या. नंतर संध्याकाळी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘व्हर्च्युअल’ समारंभात न्या. बोबडे यांना वकीलवृंदाने औपचारिक निरोप दिला. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, न्या. इंदू मल्होत्रा यांचा अपवाद वगळता, गेल्या वर्षभरात निवृत्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वकील संघटनेने असाच ‘व्हर्चुअल’ निरोप दिला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button