नवीन मनोरा आमदार निवासाचे ठरता ठरेना; वर्षभरानंतर तोच निर्णय

Manohar MLA Residence

मंत्रालयाजवळ असलेले मनोरा आमदार निवास (Manohar MLA Residence) अडीच वर्षांपूर्वी पाडण्यात आले. दीड वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले; पण अजूनपर्यंत बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. मंगळवारी उच्चाधिकार समितीची एक बैठक झाली. त्या बैठकीत नवीन मनोरा आमदार निवासाची उभारणी राष्ट्रीय इमारत बांधणी महामंडळाऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास मंजुरी देण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

मनोरा आमदार निवासाचा प्रवास रंजक आहे. सरकारी अनास्था एका चांगल्या प्रकल्पाची कशी वाट लावते त्याचे हे उत्तम उदाहरण. जवळपास अडीच वर्षांपूर्वी ही इमारत पाडण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळात ही इमारत बांधण्याचे कंत्राट एनबीसीसीला देण्यात आले होते. मात्र एनबीबीसीच्या दिरंगाईचा फटका इमारत बांधणीला बसला. दुसरीकडे राज्य शासन आणि महापालिका तसेच एमएम आरडीए विविध प्रकारच्या आवश्यक परवानगी वेळेत देत नसल्याचे एनबीबीसीचे म्हणणे होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये एक बैठक घेऊन हे काम एनबीसीसीकडून काढून सार्वजनिक बांधकाम खात्याला द्यावे असे निर्देश दिले होते. आज उच्चाधिकार समितीने त्याबाबतचा निर्णय घेतला. पर्यावरणविषयक मंजुरी नाही तर नवीन बांधकामाची मंजुरी नाही असे चित्र आजही कायम आहे.

आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), संसदीय कार्यमंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार उपस्थित होते. या कामाच्या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. नवीन आमदार निवासाचे काम तातडीने सुरू करून जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना सभापती व अध्यक्षांनी यावेळी केल्या.

मनोरा आमदार निवासात पूर्वी राहणाऱ्या आमदारांना सध्या भाड्याच्या खोलीत राहावे लागत आहे. त्यासाठी त्यांना महिन्याकाठी जे भाडे शासनाकडून दिले जाते त्यात मंत्रालयाच्या १५ किलोमीटरच्या परिसरातही फ्लॅट मिळत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या खिशातील पैसे मोजून आमदारांना निवासाची व्यवस्था करावी लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER