अंबाबाई मंदिरात ही असणार नियमावली

ambabai temple

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून (सोमवार) खुले होत आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नियमावली बनवली आहे. मंदिर दर्शनासाठी उघडणार असले तरी कोरोनाचे संकट मात्र आहे आणि त्यामुळेच भक्तांनी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.

उद्या सकाळपासून नेहमीप्रमाणे अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. मात्र गेल्या 7 महिन्यांपासून अधिक काळ मंदिर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ 2 ते 3 हजार भाविकांना दररोज दर्शन देण्यात येणार आहे. शिवाय याबाबत नेटके नियोजन सुद्धा देवस्थान समितीने केले आहे.

अंबाबाई मंदिरात येण्यासाठी एकूण 4 दरवाजे आहेत. मात्र, त्यातील पूर्व दरवाजातून प्रवेश दिला जाणार असून दक्षिण दरवाजातून भक्तांना बाहेर पडता येणार आहे. मंदिरातील इतर परिसरात सुद्धा भक्तांना फिरता येणार नाही. त्यासाठी बॅरिगेट लावण्यात येणार आहेत. मंदिरामध्ये असलेली सर्व दुकानेसुद्धा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

गेल्या 7 महिन्यात मंदिर प्रशासनातील एकाही कर्मचारी, पुजाऱ्याला सुदैवाने कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, उद्यापासून मंदिर सुरू होत आहे. देशभरातून भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकांची तपासणी केली जाणार असून त्यांना सॅनिटायझ करून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय मास्क नसेल त्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. या नियमावली पालन करूनच भाविकांना अंबाबाईचे दर्शन मिळणार आहे. याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER