भूमिका “त्याच्या “सासू-सासर्‍यांची

The role of his in-laws

विवाह (Marriage) दोन व्यक्तींमध्ये होतो, आणि त्यांचे सहजीवन घडवतो. ही त्यांची पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे खरी. पण त्यानंतरही लग्नानंतर केवळ ती दोघे परस्परांशी बांधल्या जात नाही, तर दोन्ही कुटुंबही बांधली जातात, एकत्र येतात. अशा पद्धतीने विवाह हा एक सामाजिकतेचाही भाग असतोच.

आतापर्यंत आपल्या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत मुलगीच मुलाच्या घरी राह्यला जाते. त्यामुळे आपोआपच तिला जिथे राहायचे तिथल्या वातावरणाशी परिचित होणे, ते समजून घेणे नैसर्गिकपणे अपेक्षित असते.

पूर्वीपर्यंतच्या परिस्थितीत मुलीने पूर्ण रितीभाती, पद्धती, लवकरात लवकर सासरच्या शिकून घ्याव्या आणि तसं वागावं. मोठ्यांचा मान ठेवून निमूटपणे ऐकावं. सगळ्यांचं, आल्यागेल्याचं आदरातिथ्य करावं, सणवार करावे, मोठ्यांची सेवा आणि लहानांचे लाड हे सगळं त्या मुलीने करावं असं अपेक्षित होतं. नंतर मुली शिकून नोकरीही करत होत्या. पण नोकरी घर समतोल राखत सर्व साधलं जायचं. या सगळ्या असलेल्या अपेक्षांमुळे घरातील मुलीची सासू हे परंपरेने नाते खूप बदनाम झालेले आहे. कारण त्याप्रमाणे रिती शिकवण्याची जबाबदारी तिची असायची.

परंतु आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आपल्याला ज्या पद्धतीने बदलावं लागलं, त्याच पद्धतीने आजच्या काळातील सासू सुनेला बदलवू पहात नाही. हा खूप सकारात्मक बदल आहे. परंतु स्वतः त बदल हा तर आवश्यक असतो. कारण तिला नवीन वातावरणाशी ऍडजेस्ट करणं गरजेचं असतं.ही तिची गरज तिच्या स्वास्थ्यासाठी असते.

मग घराची ओळख करून देण्याची जबाबदारी येते ती आजही “त्याच्या” आईवर. त्या दोघींची ही कसोटी आहे. दोघींचाही दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. (आणि या दृष्टिकोनाला मदत करण्याची जबाबदारी खरेतर मुलीच्या आईची असते.) समजावून सांगण्याची योग्य पद्धत अमलात आणणे, एकच गोष्ट लावून धरणं, अट्टाहास ह्या गोष्टी टाळून आपली भूमिका निभावताना सासू या पदाधिकारी व्यक्तीची परीक्षा असते. या परीक्षेत’ संयम ‘ समोरच्या नव्या मुलीला समजून घ्यायला पुरेसा वेळ देणं, वाट बघणं, याला सगळ्यात जास्त मार्क असतात. एखाद्या खडकावर सतत पाण्याची धार पडत असेल तर जसे त्याचे वाळूचे कण वेगळे होत जातात, त्याचप्रमाणे आज – कालच्या मुलींची व्यक्तिमत्व, लग्नाची वय वाढल्याने पूर्ण घडलेली असतात .पक्की झालेली असतात. त्यात बदल व्हायला हवा असेल तर गोडीगुलाबीने कुठल्याही अपेक्षेशिवाय आपले काम करत राहणे. म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणा ना! अमलात आणावा लागतो. त्यामुळे दररोज बघून बघून, हळूहळू नवीन आलेल्या व्यक्तीच्या सवयी, विचार, वर्तन व नवीन घरासंबंधीच्या भावना तयार होत जातात.

आजच्या तरुण मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना त्यांचे निर्णय घ्यायची सवय आहे. स्वतः च्या अनुभवांनी शिकत राहण त्यांना आवडतं. हे ओळखून मागितल्याशिवाय सल्ला न देणे, ही भूमिका त्यांच्या सासू-सासर्‍यांनी घेणे अपेक्षित असतं. त्यामुळे फक्त दुरून लक्ष देणे, कुठे तोंडावर आपटत तर नाही ना? हे बघणं ही आज काळाची गरज आहे आणि सुदैवाने आज बऱ्याच ठिकाणी समजून-उमजून ही भूमिका घेतली जाते. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी मुली सासूबाईंजवळच जास्त रिलॅक्स दिसतात. लाड कौतुक करून घेतात.

It’s a good sign ! मग प्रश्न येतो कुठे? आत्तापर्यंत आपण बघितलं तोपर्यंत बॅलन्स झालेला आहे. आता परत इनबॅलन्स होण्याचं कारण काय ?

तर आजकालचा प्रश्न हा आहे की, मुलींचा माहेर कडे असणारा प्रचंड ओढा आणि माहेरच्यांचा आई-वडिलांचा मुलीच्या संसारात होणारा सततचा हस्तक्षेप !

हा कित्येक ठिकाणी अतिशय कठीण प्रश्न होऊन बसलेला आहे. मुलगी स्वतः कमावते आहे. आज मुलांमध्ये व मुलींमध्ये फरक नाही. त्यामुळे मुलगी व जावई यांनी तिच्या आई-वडिलांची ही काळजी घेणे, त्यांच्या गरजेला धावून जाणे, चौकशी करणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी गरज असेल तर आपल्या मिळकतीतील भाग आई-वडिलांवर खर्च करणे आवश्यकही आहे. (जसेकी एकुलती एक मुलगी, भाऊ विचारत नसणे, आजारी आई-वडील, घरची खूप गरिबी) अशा प्रसंगी दोघांनी मिळून एक मताने ही मदत करायला हरकत नाही.

पण प्रश्न त्याच्या फार पलीकडला आहे. त्यात भरीस भर मोबाईल फोनची पडली आहे. दिवसातून अनेक वेळा माहेराशी कॉन्टॅक्ट करणे, घरात इतर मोठी माणसं असताना प्रत्येक निर्णय, प्रत्येक खरेदी यासाठी माहेरी सल्ले विचारणे, घरातल्या बारीक-सारीक गोष्टी माहेरी सांगणे, सतत सासुच्या आणि सासरच्या तक्रारी माहेरी करणे, नावें ठेवणे. सतत तिकडच्या चिंतेत रहाणे. घरात लक्ष न देणे आणि प्रत्येक वेळी काहीही बिनसलं की माहेरी जाण्याची धमकी देणे. या गोष्टी वाढायला लागल्या आहेत.

याचबरोबर दुसऱ्या बाजूने मुलीच्या आईची भूमिका पार बदललेली आहे. मुलीचा सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण वृत्तांत त्यांना हवा असतो, मुलीच्या सासरच्या बारीक गोष्टीत मुलीला सल्ले देणे, वागण्या बोलण्या विषयी,अतिशय चुकीच्या टिप्स देणे, ज्यामुळे बरेचदा मुलीचे सासरचे नातेसंबंध आणि त्या दोघांचे सहजीवन बिघडण्याचा संभव असतो. प्रत्येक गोष्ट मुली आईला विचारतात ? तेव्हा मुलीला योग्य सल्ला देऊन, सासरच्या पद्धती, सासूबाईंच्या सल्ल्याने करण्याचा विचार मुलीच्या आया मुलीला का देत नाहीत? किंवा अगदी छोट्या गोष्टी, जेवली का? दमली का? आवाज असा का येतो? दर दोन दिवसाआड माहेरची चक्कर करायला लावणे. (माहेर गावात असेल तर) वाढीस लागली आहे.

परदेशातून काही दिवसांसाठी लेक जावई नातू जर आलेत, तर काही दिवस माहेरी राहून सासरी गेल्यावर त्या आजी-आजोबांना सुद्धा नातवाशी खेळावस वाटत असेल, याचं भान न ठेवता सतत मुलीला बोलावून घेणे, मुलींनी पण पटकन बाळाला उचलून बाहेर घेऊन जाणे, यात मुलाच्या आई वडिलांची किती भावनिक ओढाताण होत असेल हे लक्षात कोणी घ्यायचं ?

असाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींना शिक्षणापुढे कुठल्याच कामाची सवय न लावणे. स्वतः स्वतः च्या सगळ्या गोष्टी करण्याची सुद्धा सवय नसणे. कपड्यांना गुंड्या लावणे, घरातला केर काढणे, वरण भाताचा कुकर लावणे, भाज्या चिरणे, लसूण सोलणे, धान्य निवडणे ही कामे मुले व मुली दोघांनाही यायलाच हवीत. अगदी लहान मुलांनासुद्धा मोटर स्किल डेव्हलप होण्यासाठी ही शिकवत असतो आपण ! पण लाडाने म्हणा किंवा करिअरसाठी म्हणा, एवढे दूर ठेवले जाते की त्यातून आपल्या मुलीचे नुकसान होणार आहे, हे आई वर्ग लक्षात घेत नाही. अशी आंधळी माया काय कामाची?

घरकामातही काय मजा आहे !करून खाऊ होण्यातही किती गंमत येते ही ओळख करून देण्याची जबाबदारी आईची असते. लग्नानंतर मुलीने सतत माहेरी येणे ,भावाच्या संसारात दखल देत, आपली मतं नोंदवणे, तुलना करणे, आई वडीलांकडे, भाऊ वहिनी विषयी तक्रार करणे हे सगळं वागणं कुटुंबातील वातावरण कलुषित करते.

आजकाल चौकोनी कुटुंबामध्ये मानसिक गुंतवणूकही खूप असते. मुलीचा विरह सहन होत नाही. या एकटेपणातून मुलीच्या संसारात हस्तक्षेप आणि सासरविषयी मत कलुषित करणे घडून येते. नाहीतर काही एकदमच दुसरे टोक गाठतात. ” दिल्या घरी तू सुखी रहा!”डोक्यावरचं ओझं उतरलं अशी ही भाषा असते जी तरुण मुलांना अजिबात मानवत नाही. दोघांच्याही आई-वडिलांचा मार्गदर्शन, सल्ला किंवा अनुभवाचे बोल यांनी जर एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तर आपोआप त्याचा हस्तक्षेपाच्या प्रांतात प्रवेश होतो. हे हस्तक्षेप सहजीवनात कधीकधी घोटाळा करतात. आणि काही प्रसंगात हस्तक्षेप न केल्याने प्रकरण हाताबाहेर जातात.

म्हणूनच भारतीय पद्धतीतील आधार, प्रेम, सुरक्षितता जपून जर ज्याला त्याला आपलं स्वातंत्र्य, ओळख, काळानुसार बदलण्याची मुभा असेल तर कुटुंबाचे व त्या दोघांचेही सूर जुळून नादमधुर संगीत उमटेल.

ही बातमी पण वाचा : प्रिय सखी, आता तरी जागी हो !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER