‘लग्न करू शकत नसले तरी त्यांना एकत्र राहण्याचा हक्क’

Live In Relationship - Punjab And Haryana High Court
  • तरुण ‘लिव्ह इन’ पे्रमिकांना हायकोर्टाचा दिलासा

चंदिगढ : कायद्यानुसार लग्न करण्याचे वय झाले नसले तरी ती दोघं कायद्याने सज्ञान असल्याने त्यांच्या इच्छेनुसार लग्न न करताही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (Live In Relationship) मध्ये एकत्र राहण्याचा त्यांना हक्क आहे आणि त्यांच्या असे एकत्र राहण्यास त्यांचे पालक किंवा समाजही आडकाठी करू शकत नाही, असे जाहीर करून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab And Haryana High Court) एका तरुण प्रेमी (Couple) युगलाला दिलासा दिला.

जिंद जिल्ह्यातील या प्रेमी युगलातील मुलगी १९ वर्षांची तर मुलगा १८ वर्षांचा आहे. त्यामुळे मुलगी कायद्यानुसार लग्न करण्याच्या वयाची असली तरी मुलगा मात्र २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय रीतसर लग्न करू शकत नाही. असे असूनही दोघांनी १८ जानेवारीपासून  ‘लिव्ह इन’ पद्धतीने एकत्र राहणे सुरु केले. साहजिकच मुलीच्या पालकांनी आणि इतर कुटुंबियांनी याला तीव्र विरोध केला व दोघांंनाही गंभीर परिणामांची धमकी दिली. दोघांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे फिर्याद दाखल केली. पण त्यांनी काहीच दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

न्या. अलका सरिन यांनी या पेरमिकांचा एकत्र राहण्याचा हक्क मान्य करताना नमूद केले की, दोन्ही याचिकाकर्त्यांना जगण्याचा मुलभूत हक्क आहे व या हक्कात आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा हक्कही अंतभूत आहे. यातील मुलगा लग्नाच्या कायदेशीर वयाचा झाला नसला तरी १८ वर्षांचा म्हणजे सज्ञान आहे. दोघेही सज्ञान असल्याने त्यांना जर दोघांना लग्न न करता एकत्र राहायचे असेल तर ते नक्कीच तसे राहू शकतात. कारण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

या व्यक्तिगत अधिकारात या दोघांचे पालक हस्तक्षेप करू शकत नाहीत किंवा आपली मते त्यांच्यावर लादू शकत नाहीत, असे सांगत न्यायालयाने म्हटले की, मुलीच्या घरच्यांचा विरोधही मुख्यत: समाजाच्या भीतीपोटीच आहे. पण समाजालाही यात ढवळाढवळ करण्याचा हक्क नसल्याने ‘समाज काय म्हणेल’ याला काहीच किंमत नाही.

या प्रमाणे कायदा विषद करून या दोघांच्या फिर्यादीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यानुसार निर्णय घ्यावा, असा आदेश दिला गेला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER