परतीच्या पावसामुळे गळीत हंगाम लांबणार

Heavy Rains

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यंदाच्या वर्षी सुमारे १८० कारखाने गाळप हंगाम घेणार आहेत. त्या दृष्टीने कारखान्यांची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, परतीचा पाऊस सुरू झाल्याने ऊसतोडणीस शेतात घात येणार नाही. अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. जिल्ह्यात सलग दोन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पडणाऱ्या पावसाने आज रविवारी सकाळपासून उसंत दिली. दुपारी चार वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे खरीप पिकांच्या काढणीवर परिणाम होणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला नारंगी इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भात, सोयाबीन आदी पिकांच्या काढणीवर परिणाम होणार आहे. खरिपातील विविध पिके काढणीस आल्याने पावसामुळे काढणी खोळंबली आहे. रब्बीच्या पेरणीवर पावसाचा परिणाम होणार आहे. मागील आठवड्यापासून हवेत वाढलेला उष्मा पावसामुळे कमी झाला. ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER