परतीचा मान्सून राज्यात दुसऱ्या दिवशीही बरसला अनेक ठिकाणी

Kokan Rain-Orange Alert

मुंबई : परतीचा मान्सून सलग दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार बरसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत शेतीची कामे थांबली. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस झाला. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही तळकोकणात मुसळधार पाऊस पडतो आहे. जिल्ह्यातले भात कापणीचे काम थांबले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी घुसले आहे. कापलेले धान भिजल्याने खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संपूर्ण कोकण परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून तासी ७० कि. मी. वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळेला राहील.

बुलडाणा
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा सलग दुसऱ्या दिवशीही बसला. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मात्र पीक वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. सध्या सोयाबीन काढणीच्या स्थितीत आहे. कापूसही फुटला आहे. परतीच्या पावसाने सर्व नुकसान होते आहे.

सांगली
जिल्ह्यात १० ऑक्टोबर रोजी अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कडेगाव, मिरज, तासगाव वाळवासह अनेक भागांत मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यातील द्राक्ष बागायती पट्ट्यात छाटण्या सुरू आहेत. या कामात पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. छाटणीनंतर द्राक्षबागेच्या काड्या जोमाने फुटाव्या म्हणून लावली जाणारी पेस्ट कालच्या मुसळधार पावसाने वाहून गेली. पुन्हा काड्यांना पेस्ट लावण्याची वेळ आली आहे. यामुळे खर्च वाढतो आहे.

बीड
कासारी बोडखामध्ये बाजरी काढून ठेवलेल्या ढिगावर वीज कोसळली आणि बाजरीच्या ढिगाचा कोळसा झाला. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथे रात्री पावसासोबत विजाचांही मोठा कडकडाट होता.

जालना
जिल्ह्यात आज सर्वदूर जोरदार पाऊस बरसला. सलग दोन दिवसांपासून परिसरात पाऊस आहे. परतूर आणि घनसावंगी तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार आहे. परतूर तालुक्यात काही मिनिटातच रस्ते जलमय झाले. सोयाबीन, उडीद, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वाशीम
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडतो आहे.

सोलापूर
सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. काल संध्याकाळी जिल्ह्यातील जवळपास सर्व भागाला पावसाने झोडपले. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर इथंही मुसळधार पाऊस पडतो आहे. बार्शी तालुक्यातील काही भागातदेखील पाऊस सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER