रिपोर्ट तर आव्हाड आणि मालिकांनी तयार केला, सही फक्त कुंटेंची, फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सादर करण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, त्यावर फक्त सही करण्याचे काम त्यांनी केले असावे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज केला. मी सीताराम कुंटे यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळ मार्गाने चालणारे अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, अशी माझी शंका आहे. हा अहवाल मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिका यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर फक्त सही करायला लावली असेल, अशी शंकाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांना तथ्यहीन असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या अहवालात अनेक चुका आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण कायद्यानुसार एखादा गुन्हा होण्याचा संशय असेल तर फोन टॅपिंगची परवानगी असते. नेमकी हीच ओळ अहवालातून वगळण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही याच कलमाखाली फोन टॅप केले जातात. त्यामुळे फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवालच चुकीचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी उघड केला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल पत्रकार परिषदेत पत्रकारांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे सांगत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सोपवला आहे. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. .

तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER