माणुसकीचा धर्म ही करोनाची देणगी व्हावी…

Shailendra Paranjapeकरोना (Corona) संकटामुळे जगण्याचे सारे नियमच बदलून गेले आहेत. संध्याकाळचा घरात काय बसला आहेस, असं मुलांना विचारण्याऐवजी घराबाहेर जाऊ नको रे बाबा, असं सांगायचे दिवस आलेत. तू सारखा सारखा मोबाइलशी खेळत असतोस, किंवा सारखं काय ऑन लाइन, जरा मोकळ्या हवेत जा खेळायला, या वाक्यांऐवजी बाहेर पडू नको रे बाबा कारणाशिवाय…हे परवलीचे वाक्य झाले आहे.

प्रत्येक संकट विविध प्रकारच्या संधीही निर्माण करत असते आणि अशा संधींपैकी एका खूप मोठ्या संधीकडे प्रख्यात लेखिका मंगला नारळीकर यांनी लक्ष वेधलं आहे. त्यांनी दैनिक लोकसत्तामधे लेख लिहून सर्व धर्मनियमांची तपासणी करायची ही योग्य वेळ आहे, असं या लेखात लिहिलं आहे. सर्व धर्मप्रमुखांनी आपापल्या धर्मातल्या नियमांची तपासणी करावी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे, हेही त्यांनी नमूद केलंय. परोपकार हेच पुण्य आणि परपीडा हे पाप, या पायाला कोणाचाच आक्षेप असणार नाही, हेही त्यांनी नमूद केलंय. मुळात करोनाच्या संकटात जगभर सगळीकडे माणुसकी हा धर्म प्रामुख्याने रोजच्या रोज अनुभवास येत असताना या विषयाकडे त्यांनी लक्ष वेधल्याबद्दल त्यांचे आणि लोकसत्ताचेही अभिनंदन.

अंधार दूर करणे म्हणजे काय तर एक छोटासा दिवा लावला की ते आपसूकच घडते. तसाच एक प्रयत्न मंगला नारळीकर यांनी धर्मनियमांच्या विचाराच्या संदर्भात मांडला आहे. काळाच्या ओघात त्याज्ज्य असलेल्या गोष्टी निघून जायला हव्यात तसंच काळाच्या कसोटीवरच करोनाच्या संकटाचा फायदा घेऊन धर्मनियमांबद्दलही सिंहावलोकन करायला हरकत काय आहे… धर्मातल्या नियमांबद्दल त्या त्या धर्मातले किंवा या विषयाचा अभ्यास असलेले ज्येष्ठ लोक, तज्ज्ञ विचार मांडतीलच आणि नारळीकर यांनाही विचारमंथनच अपेक्षित आहे. त्यामुळे हा विचार इथे मांडताना फक्त मी त्याचा स्कोप थोडासा धर्मातल्या नियमांऐवजी दैनंदिन जीवनातल्या अनुभवांबद्दल मांडतोय.

लहानपणी शाळेत असताना नाव पत्ता लिहिल्यानंतर धर्म आणि तो लिहिल्यावर हिंदूब्राह्मण असं शाळेत लिहिल्याचे आठवत आहे. वैभव वाघ या पुण्यातल्या धडपड्या कार्यकर्त्याने धर्म लिहिण्याची आणि जात लिहिण्याची सक्ती शाळेचे अर्ज भरतानाच केली जातेय, याकडे लक्ष वेधलेय. संगणकावरून ऑनलाइन अर्ज भरताना धर्म आणि जात हे स्तंभ भरले नाहीत तर अर्जच भरून पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याने चक्क सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. शाळेचा अर्ज भरताना भारतीय किंवा इंडियन हा पर्याय धर्म आणि जातीला असावा, कारण अनेक जण माझा धर्म आणि जात भारतीय असं अभिमानानं सांगतात तसं आचरणही करतात. पण त्यांना तसा संस्कार पुढच्या पिढीवर करताना या ऑनलाइन अर्जामुळे समस्या येते. त्यामुळे शालेय अर्जातच हा पर्याय यावा, यासाठी वैभव वाघ प्रयत्नशील आहे.

एकीकडे करोनाने साऱ्या जगावर संकट आणलेच आहे पण त्यानिमित्ताने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल झालेत. चाचण्याक्षमता, लसविकसन, रुग्णालये, प्राणवायूनिर्मिती क्षमता या सर्वात सुधारणा झाल्यात. तसेच डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातले वॉर्डबॉइज, रुग्णसेवा करणारे मामा-मावश्या या सर्वांबद्दल आदरभाव निर्माण झाला आहे. त्यांना करोना वॉरियर्स असंही संबोधलं गेलं आहे. पण जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अपार परिश्रम करणारे, अफाट बुद्धिमत्तेने ते ते क्षेत्र आणि आपलं जगणंही उजळून टाकणारे अनेक लोक कार्यरत आहेत. त्या सर्वांबद्दल कायमच ऋणी राहणं, त्यांच्या कामाबद्दल आदर असणं, समाजहितैषी काम करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला तोच करोना वॉरियरसारखा आदरभाव, प्रेम मिळणं, हे घडायला हवं.

बसमधे प्रवास करताना, रेल्वेमधे किंवा विमानातही शेजरी कोण बसलंय, ती व्यक्ती कोणत्या जातीची पोटजातीची किंवा धर्माची आहे, यानं आपल्या गन्तव्य स्थानात काहीही फरक पडत नाही. तसेच करोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्यांनी, रक्तदान करणाऱ्यांनीही जातीपातीचा धर्माचा विचार केलेला नाही. राष्ट्रांच्या भिंतीही करोना मदतीच्या आड आल्या नाहीत. त्यामुळे माणुसकी धर्माचा प्रत्यय केवळ करोना काळापुरता न राहता करोनाची जगाला देणगी काय तर माणुसकी धर्माचा उदय, ही असावी आणि त्यामुळेच करोना गेल्यानंतर खरी कसोटी आहे ती आरोग्याची काळजी घेण्याइतकीच माणुसकी धर्म टिकवण्याची. तो टिकवण्यासाठीही कटिबद्ध होऊ या.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button