अश्विनने 114 वर्षानंतर केलेल्या विक्रमाची अक्षरकडून 15 दिवसांतच पुनरावृत्ती

axar patel & Ravichandran Ashwin

साधारण 15 दिवसांपूर्वी रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) ती कामगिरी केली होती जी गेल्या 114 वर्षांत कुणालाही जमली नव्हती. पण आता त्यानंतर पंधराच दिवसात अक्षर पटेलने (Axar Patel) तीच कामगिरी दोन दिवसात दोन वेळा केलीय. त्यामुळे क्रिकेट जगतात कोणताही विक्रम दूर्मीळ नाही हेच दिसून आलेय. अशी काय आहे ती कामगिरी?

तर कसोटी सामन्यामध्ये डावात पहिल्याच चेंडूवर फिरकी गोलंदाजाने गडी बाद करणे. अशी कामगिरी करणारा ‘अॕश’ अण्णा हा केवळ तिसराच फिरकी गोलंदाज ठरला तो 8 फेब्रुवारीला चेन्नईत आणि आता ‘बापू’ पटेलने अहमदाबाद कसोटीत 24 पाठोपाठ 25 फेब्रुवारीला हाच पराक्रम केला.

24 तारखेला इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर जाॕनी बेयरस्टोला (Johny Bairstow) पायचीत पकडले. बेयरस्टोने रिव्ह्यूसुध्दा घेतला पण उपयोग झाला नव्हता. चेंडू वळणार या अपेक्षेने बेयर्स्टो खेळला पण अक्षरने चेंडू सरळ टाकला होता आणि मिडल स्टम्पच्या समोर त्याच्या फ्रंट पॕडवर आदळला होता.

पहिल्याच चेंडूवर अक्षरला विकेट मिळाली होती. पण अश्विनची 8 फेब्रुवारीची कामगिरी आणि ह्या कामगिरीत एक फरक होता. अश्विनला डावाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली होती तर अक्षरची विकेट ही डावातील सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर होती. त्याच्याआधी इशांत व बुमरा यांनी प्रत्येकी तीन षटकं टाकलेली होती पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारीला अक्षर हा अॕश अण्णासारखीच डिट्टो कामगिरी करणार होता.

दुसऱ्या डावात सुरुवातीलाच कर्णधार कोहलीने चेंडू अक्षरच्या हाती सोपवला आणि ‘बापू’ने अगदी पहिल्याच चेंडूपासून सुरुवात केली. यावेळी त्याने झॕक क्राॕलीची (Zak Crawley) दांडीच उडवली. मागे जागून खेळताना क्राॕली याला चेंडूची लाईनच उमगली नाही. आणि सामन्याच्या दोन्ही डावात आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा तो फिरकी गोलंदाज ठरला. यापैकी दुसऱ्या डावातील बळी तर डावाच्याच पहिल्या चेंडूवर होता. याप्रकारे अॕश अण्णाने 114 वर्षानंतर केलेल्या विक्रमाची अक्षर पटेलने 15-16 दिवसांतच पुनरावृत्ती केली.

सहसा कोणत्याही प्रकारच्या सामन्यांमध्ये सुरुवातीलाच फिरकी गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला जात नाही. पण इंग्लंडविरुध्दच्या या मालिकेत अश्विन व अक्षर हे त्याला अपवाद घडवत आहेत.

चेन्नईच्या कसोटीत इंग्लंडने भारताला फाॕलोआॕन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला त्यावेळी उपाहाराआधीच्या फक्त दोनच षटकांचा खेळ बाकी होता. खेळपट्टीवर चेंडू वळताना दिसत होता म्हणून त्यावेळी इंग्लंडची कोंडी करण्यासाठी विराटने सुरुवातीलाच चेंडू अश्विनच्या हाती सोपवला होता आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोरी बर्नस् ला (Rory Burns) रहाणेकडून झेलबाद केले होते.

क्रिकेटच्या विक्रमांमधील नोंदीनुसार कसोटी डावाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारे फिरकीपटू असे…

  1. बाॕबी पील (इंग्लंड) वि. अॕलेक बॕनरमॕन(आॕस्ट्रेलिया)- मँचेस्टर – 1888
  2. बर्ट व्होल्गर ( द.आफ्रिका) वि. टॉम हेवर्ड, (इंग्लंड)- ओव्हल- 1907
  3. रविचंद्रन अश्विन (भारत) वि. रोरी बर्नस् (इंग्लंड)-.चेन्नई- 2021
  4. अक्षर पटेल (भारत) वि. झॕक क्राॕली (इंग्लंड)- अहमदाबाद- 2021

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER