खरी कसोटी शिवस्वराज्य दिनानंतर…

Shiv Swarajya Day

Shailendra Paranjapeमहाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक समारंभ ६ जून १६७४ ला झाला. त्या दिवसाचं औचित्त्य म्हणून राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा केला गेला. आकाशवाणीवरून शिवाजी महाराजांवरील विविध प्रकारची गीतं लावली गेली. त्यात चित्रपटगीतं होती तशीच चित्रपटात न आलेली पण शिवछत्रपतींचे गुणगान गाणारी गाणी, पोवाडे या सर्वांचा समावेश होता. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन करून ही गुढी जिल्हा परिषदेच्या पुण्यातल्या मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उभारली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला शुभेच्छा देताना युगप्रवर्तक स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना त्रिवार मुजरा केलाय आणि जनतेलाही शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या विभागाच्या आदेशानुसार सावित्रीबाई फुले पणे विद्यापीठासह राज्यभरातल्या शिक्षण संस्थांमधे शिवस्वराज्य दिन साजरा केला गेला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून राज्याभिषेक दिन साजरा होत असे. मुख्यमंत्र्यांनीही राज्याभिषेकदिनाच्या शुभेच्छाच जनतेला दिल्या आहेत. असेच आदेश ग्रामविकास खात्यानंही काढलेत.

महाराष्ट्रात शेती क्षेत्रात प्रमाणीकरण नाही आणि त्यामुळे शेतमाल असो की दूध, ब्रँण्ड व्हँल्यू नसल्याने अमूलसारखा महाराष्ट्राच्या दुधाचा प्रमाणित ब्रँण्ड नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले विविध कंपन्यांचे किंवा सहकारी संस्थांचे दूध वितरित होते पण अमूलसारखे हातपाय महाराष्ट्राचा एकच एक ब्रँण्ड काही पसरू शकला नाही. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनमानसावर संस्कार करत आलेल्या वारकरी संप्रदायात ज्ञानोबा माऊली तुकाराम…अशी नावं मनोभावे घेत भजने सादर होतात आणि याची महती वारी हे जागतिक आकर्षण आहे. पण महाराष्ट्रीयन कोणाला म्हणायचं तर पु ल देशपांडे यांनी केलेली व्याख्या चपखल आहे आणि ती म्हणजे शिवाजी महाराज की…असं म्हटल्यावर जो जय म्हणत नाही तो महाराष्ट्रीयन नाही. त्यामुळे महाराजांच्या गडकोटांचे जतन करणे, ही खरी त्यांना मानवंदना ठरेल. गेल्या शंभर वर्षात साऱ्या बहुरंगी बहुसंस्कृतींना महाराष्ट्रानं सामावून घेतलं. त्यातून मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण केले. या सर्व मंथनानंतर १९६० मधे महाराष्ट्र हे राज्य भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार निर्माण झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले.

हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटलंय की, महाराजांनी राज्याभिषेकातून जनतेचं आत्मभान जागं केलं. जनतेच्या मनातलं लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं आणि मातृभूमी-प्रजा यांच्या हिताला प्राधान्य दिले. शिवराज्याभिषेकदिन हा मराठी जनतेच्या हृदयावर कोरलेला क्षण आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी संदेशात नमूद केलंय.

जनतेला संदेश देतानाच माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण खरोखर महाराजांना आनंद वाटेल, असा कारभार करतोय का याचा विचार करायला हवा. तसंच राजनीतीमधे कायमस्वरूपी मित्रंही नसतात आणि शत्रूही नसतात, हे लक्षात घेऊन वागावं लागतं. हे मुत्सद्दीपण शिवाजीमहाराजांकडे होते. त्यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यापुढे नमतं घेतानाही धूर्तपणे तह केला होता आणि तो महाराष्ट्राच्या किंवा तेव्हाच्या स्वराज्याच्या कल्पनेच्या हितासाठीच. मुख्यमंत्र्यांनीही अफझलखान (त्यांच्या मनातले) वगैरेंविरुद्ध योजनाबद्ध रीतीने यंत्रणा उभी केली आणि आपण मनातल्या अफझलखानाविरुद्ध आघाडी केली ते खरोखर अफझलखानाचे सैन्य आहे का, याचा विचार करायला हवा कारण सध्याचं राजकारण ही युद्धभूमी नव्हे, हेही लक्षात घ्यायला हवं.

राजकारणात शत्रू-मित्र ओळखणं, हे निम्मं यश असतं. तसं मुख्यमंत्र्यांनी अल्पकालीन यश मिळवलं खरं, पण त्यात काय काय गमावलं आणि पदरी काय पाडून घेतलंय, या ओझ्याचा बोजा आता जाणवू लागणार आहे कारण करोना संपला की मोर्चे आंदोलने मुख्यमंत्र्यांची कसोटी बघणार आहेत. त्याला ते कसे तोंड देतात, त्यावरून शिवस्वराज्य दिनातून त्यांनी काही बोध घेतला की नाही समजेल. जनता बिचारी सगळ्यांकडून रोज बोधच घेतीय. सध्या तरी शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा आणि महाराजांना त्रिवार मुजरा.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button