येडियुरप्पांविरुद्ध ‘आमदार खरेदी’ गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरु होणार

High Court of Karnataka - B. S. Yediyurappa - Maharashtra Today
  • कर्नाटक हायकोर्टाने स्थगिती उठविली

बंगळुरु :- कर्नाटकचे याआधीचे एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या आमदारास राजीनामा देण्यासाठी १० कोटी रुपयांची लांच देऊ केल्यासंबंधीच्या गुन्ह्याच्या तपासास दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) अडचणीत आले आहेत. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण ‘ऑपरेशन कमळ’  म्हणून ओळखले जाते.

जनता दल (सेक्युलर)चे त्यावेळचे आमदार नागनगौडा कंडकुर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी त्यांना लांच देऊ केल्याचे हे प्रकरण आहे. त्यासंबंधी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा यासाठी येडियुरप्पा व अन्य आरोपींनी केलल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१९ मध्ये गुन्ह्याच्या तपासास व त्याअनुषंगाने केल्या जाणार्‍या पुढील कारवाईस अंतरिम स्थगिती दिली होती. या प्रकरणातील मूळ फिर्यादी व नागनगौडा यांचे चिरंजीव शरणगौडा यांनी केलेला अर्ज मंजूर करून न्या. मायकेल डीकुन्हा यांनी ही स्थगिती उठविली.

ही घटना ७ फेब्रुवारी २०१९ ची आहे. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्याची ‘ऑपरेशन कमळ’ ही मोहीम भाजपाने हाती घेतली होती. जनता दल (सेक्युलर) व काँग्रेस या सत्तादारी पक्षांमधील फुटीर आमदारांना आधी मुंबईत व नंतर गोव्यातील एका रिसॉर्टवर नेऊन ठेवले गेले होते. शरणगौडा यांनी नोंदविलेली फिर्याद अशी होती: देवदुर्ग मतदारसंघातील आमदार शिवानगौडा नाईक यांनी फोन करून शरणगौडा यांना देवदुर्ग येथील सरकारी सर्किट हाऊसवर बोलावून घेतले. शरणगौडा मध़्यरात्री तेथे पोहोचले तेव्हा त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले येदियुरप्पा काही आमदारांसह तेथे बसलेले होते. त्यावेळी येदियुरप्पा यांनी शरणगौडा यांच्यापुढे असा प्रस्ताव ठेवला की, त्यांनी त्यांचे वडील नागगौडा कुंडकूर यांना राजीनामा देण्यस राजी करावे. त्याबदल्यात शरणगौडा यांना गुरमिटकळ मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आणले जाईल व त्यानंतर त्यांना यादगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाईल. या निवडणुकीचा सर्व खर्च भाजपा करेल. शिवाय नागौडा कुंडकूर यांनी राजीनामा दिल्यावर होणाºया पोटनिवडणुकीत कुंडकूर यांनाही भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले जाईल व त्याबदल्यात त्यांना १० कोटी रुपये दिले जातील. आमदारची राजीनामा देऊन कुंडकूर मुंबईच्या रिसॉर्टवर पोहोचले की तेथे त्यांना १० कोटी रुपयांची रक्कम चुकती केली जाईल.

शरणगौडा यांनी येदियुरप्पा यांचे हे सर्व संभाषण रेकॉर्ड करून  फिर्याद नोंदविली. त्याआधारे येडियुरप्पा व इतरांवर भ्रष्टाचार निर्मूलन कायदा व भारतीय दंडविधानातील अन्य गुन्हे नोंदविले गेले. काही दिवसांनी पत्रकारांनी शरणगौडा यांनी रेकॉर्ड केलेल्या संभाषणाविषयी विचारले असता त्यातील आवाज आपलाच असल्याची कबुली येडियुरप्पा यांनी दिली होती. आता येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत. उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्याने त्यांच्याविरुद्धच्या या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरु होणार आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करून प्रकरण शेवटपर्यंत तडीस नेले जावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button