यूपीएचं अध्यक्षपद हा सध्या विषय नाही – नवाब मलिक

शरद पवारांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केली नाही

Nawab Malik

नवी दिल्ली : यूपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यावेळी कोणा गांधी परिवारातून नाही तर थेट पवारांचे नाव या शर्यतीत आहे. एवढेच नाही तर, स्वतः कॉंग्रेसच शरद पवारांच्या नावासाठी आग्रही असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवारांच्या यूपीएच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेनं मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेनं शरद पवारांचं काम सुरू आहे. ” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही-९ मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

“शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. यूपीएचं अध्यक्षपद किंवा विरोधी पक्षांचा नेता कोण होणार, हा सध्या विषय नाही, त्याबाबत सर्व जण मिळून निर्णय घेतील. विधान परिषदेच्या निकालांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राने स्वीकृती दिली आहे. त्यामुळे देशातही हा प्रयोग झाला, तर स्वीकारलं जाईल. जनतेला चांगला पर्याय दिल्यास सत्तांतर निश्चित आहे.” असंही नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER