मोदी-ठाकरे भेटीत दडलंय भविष्याचं वर्तमान….

Shailendra Paranjapeमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि पंतप्रधान केवळ मनकी बात ऐकवत नाहीत, तर समोरच्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतात, हा अनुभव या शिष्टमंडळाला आला. पंतप्रधान कार्यालयातील एका अधिकाऱ्याने २०१५ मधे गप्पा मारताना सांगितले होते की पंतप्रधानांची प्रतिमा काहीही असली तरी ते समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतात आणि तेही जराही प्रतिक्रिया न देता. विशेष म्हणजे समोरची व्यक्ती किती कनिष्ठ आहे, हा विचार त्यांच्या मनात कधीच नसतो आणि कुणाकडूनही अमूल्य सूचना येऊ शकते, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे म्हणूनच ते लक्षपूर्वक समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतात. ते इतके पेशंट लिसनर आहेत की आपण खरोखर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याशी बोलतोय का, हा प्रश्न पडावा इतके शांतपणे ते सारं ऐकून घेतात. ते सारं ऐकून घेतल्यावर सांगतात की तुमचं हे म्हणणं ठीक आहे पण या मुद्द्यावर माझा अनुभव असा आहे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वतंत्रपणे बंद दाराआड चर्चा झाली. या स्वतंत्र चर्चेबद्दल एका पत्रकाराने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर एरवी न चिडणारे मुख्यमंत्री ठाकरे वैतागले. त्यांनी वैतागून दिलेले उत्तर अनेक राजकीय तर्कवितर्कांना जन्म देणारे आहे.

ठाकरे यांनी सांगितले की मी देशाच्या पंतप्रधानांना भेटलो, नवाझ शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. मी आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचे नाते तुटलेले नाही. त्यामुळे मी पंतप्रधानांची वैयक्तिक भेट घेतली तर त्यात गैर काय आहे, असा सवालही ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवी दिल्लीत हे विधान केले आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही आणि आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असं मत व्यक्त केलं. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की पंतप्रधानांशी शिष्टमंडळासह भेट झाल्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक होते आणि हा प्रघात आहे.

जयंत पाटील यांनी त्यांचं सरकार पाच वर्षे टिकेल, हे म्हणण्यात काहीही वावगं नाही कारण सरकार पडेल, असं ते म्हणूच शकत नाहीत. मनात धाकधूक निर्माण झाली तरी ती दाखवणंही शक्य नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. दिल्लीतल्या पत्रकाराने पुन्हा पुन्हा पंतप्रधानांशी वैयक्तिक भेट झाली का, हे विचारल्यावर अजित पवार यांनीच आता बास म्हणत प्रेस कॉन्फरन्स गुंडाळली, ही गोष्टही पुरेशी बोलकी आहे. मराठा आरक्षणासह इतर विषयांपेक्षा ठाकरे-मोदी भेटीची बातमीच जास्ती गाजेल, या काळजीपोटी पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स गुंडाळली, असं दिल्लीतल्या पत्रकारांनी सांगितलं. तेही पवार यांच्यादृष्टीने योग्यच आहे.

फडणवीस यांची प्रतिक्रिया सर्वाधिक बोलकी वाटते. त्याचं कारण असं की एरवी हे सरकार किती टिकेल, अशा प्रकारची वक्तव्ये करणारे फडणवीस जेव्हा मोदी-ठाकरे भेट हा प्रघात आहे, म्हणतात, तेव्हा संशय बळावतो. मुंबईत पत्रकारांमधे असाही सूर ऐकू येतोय की ठाकरे आता ही रिक्षा चालवून कंटाळलेत आणि त्यामुळेच काही तरी व्हाया मेडिया काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मोठे लोक भेटतात तेव्हा चर्चा तर होतेच. त्यात ठाकरे आणि मोदी भेटलेत म्हटल्यावर तर ती जास्तीच होणार. त्यामुळे चर्चेचे फलित काही काळात समोर येईलच. अधूनमधून सिंहावलोकन केले की समजेलच की काय खरे आणि काय भास…

शैलेन्द्र परांजपे

Discalimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button