‘रेरा’ कायदा झाल्यावरही ग्राहक न्यायालयांचे अधिकार अबाधित

दाद मागण्याचा पर्याय ग्राहकाच्या हाती

RERA Act

नवी दिल्ली :बांधकाम व्यवसायाचे नियमन करण्यासाठी ‘रिअल इस्टेट (नियन व विकास) कायदा (Real Eastate Regulation and Development Act) अस्तित्वात आला असला तरी त्याने बिल्डरांविरुद्ध ग्राहकांनी केलेल्या तक्रारींवर न्यायनिवाडा करण्याचे ग्राहक न्यायालयांचे अधिकार पूर्वीप्रमाणेच अबाधित आहेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मे. इम्पेरियल स्ट्रक्चर्स वि. अमोल पटणी व इतर या प्रकरणात न्या. उदय उमेश लळित व न्या. विनीत शरण यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना म्हटले की, बिल्डरकडून व्यापारी गाळे किंवा निवासी सदनिका खरेदी करणारे ग्राहक त्या व्यवहारातील तक्रारींसाठी ‘रेरा’ प्राधिकारणाकडे दाद मागण्याखेरीज ग्राहक न्यायालयांकडे  फिर्याद करू शकतात; कारण ग्राहक संरक्षण कायद्याखालील (Consumer Protection Act) न्यायनिवाड्यास मज्जाव करणारी कोणतीही तरतूद ‘रेरा’ कायद्यात नाही. गुरुग्राम येथे मे. इम्पेरियल स्ट्रक्चर्स या विकासकाने बांधलेल्या व्यापारी संकुलातील गाळे पैसे भरूनही वेळेत दिले नाहीत म्हणून अमोल पटणी व इतर ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (NCCRC) याचिका केली होती.

त्यात आयोगाने ग्राहकांना त्यांनी भरलेले सर्व पैसे ९ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश राष्ट्रीय आयोगाने दिला होता. त्याविरुद्ध बिल्डरने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. ‘रेरा’ कायदा लागू झाल्यानंतर ग्राहक न्यायालयाकडे दाद मागता येत नाही, असा बिल्डरचा मुद्दा होता. तो फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘रेरा’ कायद्याच्या कलम ७९ अन्वये ज्यावर ‘रेरा’ प्राधिकरण निवाडा करू शकते अशा कोणत्याही प्रकरणांवर दिवाणी न्यायालयांनी निवाडा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायद्याखाली स्थापन झालेले ग्राहक तक्रार निवारण मंच व आयोग हे वरकरणी न्यायालये वाटत असली तरी प्रत्यक्षात ती दिवाणी न्यायालये नाहीत.

त्यामुळे या कलमातील मज्जाव या मंचांना किंवा आयोगाला लागू होत नाही. खंडपीठाने पुढे म्हटले की, ‘रेरा’ कायदा लागू झाल्यावर बिल्डरांसंबंधीची ग्राहक न्यायालयांकडील प्रलंबित प्रकरणे ‘रेरा’ प्राधिकरणाकडे वर्ग होतील, असेही ‘रेरा’ कायदा सांगत नाही. त्यामुळे ग्राहकास बिल्डरविरुद्ध या दोन्ही ठिकाणी दाद मागण्याचा मार्ग खुला आहे. त्यापैकी कुठे दाद मागायची हा पर्याय ग्राहक निवडू शकतो. त्याला वाटल्यास तो दोन्ही ठिकाणीही दाद मागू शकतो.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER