आरआरआरमधील राम चरणच्या प्रभू श्रीरामांच्या रुपातील पोस्टर झाले व्हायरल

Maharashtra Today

साऊथचा प्रख्यात दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या त्याच्या मल्टीस्टारर महागड्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमात प्रचंड बिझी आहे. या सिनेमाचे बजेट ३५० ते ४०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ‘बाहुबली’ सिनेमामुळे एस. एस. राजामौली संपूर्ण देशाला माहिती झाला असून त्याच्या या नव्या प्रोजेक्टची त्याने घोषणा केल्यापासून क्रेझ निर्माण झाली आहे. या सिनेमातील आलिया भट्टचे (Alia Bhatt) सीतेसारख्या रुपातील पोस्टर आलियाच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आले होते. आता मुख्य नायक राम चरणच्या (Ram Charan) वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा रामासारख्या रुपातील पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. आज म्हणजे २७ मार्च रोजी राम चरणचा वाढदिवस आहे. हे पोस्टर रिलीज केल्याबरोबर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून रामचरणवर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला आहे.

राजामौलीच्या या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) या साऊथच्या सुपरहिट नायकांसोबत आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. शुक्रवारी राम चरणने ‘आरआरआर’मधील त्याच्या अल्लूरी सीता रामराजूची झलक सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टरमध्ये राम चरण एका पौराणिक योद्ध्याच्या अंदाजात आकाशाकडे धनुष्यातून बाण सोडण्याच्या आवेशात दिसत आहे. राम चरणचा हा लुक खूपच प्रभावी दिसत आहे. या फोटोसोबत राम चरणने लिहिले आहे, धाडस, सम्मान आणि समग्रता. एक व्यक्ती, ज्याने या तिन्ही गोष्टींची व्याख्या लिहिली. अल्लूरी सीता रामराजूची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी खूपच सम्मानजनक आहे.

‘आरआरआर’ सिनेमाचे पूर्ण नाव ‘रुद्रम रणम रुधीरम’ (Roudram Ranam Rudhiram) असून हा एक पीरियड सिनेमा आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असतानाची कथा यात मांडण्यात आलेली आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असताना साऊथमधील दोन स्वातंत्र्य सैनिकांनी अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. या दोघांनीही आदिवासींसाठी निझामाविरोधात युद्ध पुकारले होते. गोरिला युद्धाचा वापर करून या दोघांनी निझाम आणि इंग्रजांना हतबल केले होते. पण इंग्रजांशी लढताना या दोघांनाही वीर मरण प्राप्त झाले होते. या दोघांची जीवनगाथा एस. एस. राजामौलीने या सिनेमात मांडली आहे. हा सिनेमा मूळ तामिळ भाषेत तयार होत असून १० भारतीय भाषांमध्ये डब करून रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे १३ ऑक्टोबर २०२१ ला रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER