
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांसह छोटी शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनारुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार का? असा प्रश्न आता विचारला जात असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सूचकविधान केलं आहे. राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ८ दिवसांचा अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कोरोनाचा अटकाव केला गेला, तसं काम कुठेही झालं नाही. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचं केंद्र सरकारनेही कौतुक केल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचं आणि उपाययोजनेचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, विजबिलाच्या मुद्द्यावरील भाजपचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या सरकारच्या काळातच वीज थकबाकी वाढली. त्यामुळेच ऊर्जा विभागाची स्थिती बिकट झाल्याची वडेट्टीवार यांनी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला