सिंधू-सायना उपांत्य सामन्याची शक्यता

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : मॉरिशसच्या खेळाडूमुळे झाला गोंधळ

sindhu-Saina badminton tournament

बाझेल (स्वीत्झर्लंड) :- आगामी विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या सामन्यांची भाग्यपत्रिका (ड्रॉ) जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) नव्याने टाकल्यानंतर भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू व सायना नेहवाल या उपांत्य फेरीतच आमने सामने येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा भाग्यपत्रिका टाकताना एका खेळाडूची प्रवेशिका चुकीने समाविष्ट केल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा नव्याने ड्रॉ टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेसाठी सिंधूला पाचवे तर सायनला आठवे मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे त्या दोघी ड्रॉच्या एकाच गटात आल्या आहेत.

सिंधू विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील दोन वेळची रौप्यविजेती असून तिचा पहिला सामना दुसºया फेरीत तैवानची पै यू पो किंवा बल्गेरियाची लिंडा झेत्चिरी हिच्याशी होईल. सायनाचाही पहिला सामना दुसºया फेरीतच होणार आहे. तिची प्रतिस्पर्धी स्वीत्झर्लंडची साब्रीना जॅकेट किंवा नेदरलँडची सोराया एजबेर्जेन हिच्याशी होईल.

बीडब्ल्यूएफने भाग्यपत्रिका पुन्हा का टाकावी लागली याचा खुलासा केलेला नाही पण व्हायरल झालेल्या माहितीनुसार ड्रॉमध्ये मॉरिशसच्या केट फू कुने हिचे नाव चुकीने टाकण्यात आले होते. मॉरिशसच्या या खेळाडूवर सध्या प्रतिबंधीत द्रवाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने बंदी आहे.