कृषी कायद्यातल्या बदलांसाठी काँग्रेसचे दबावाचे राजकारण ? चव्हाणांचे अजित पवारांना पत्र

Ashok Chavan - Ajit Pawar

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या २१ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. केंद्राने पारित केलेले नवे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. तर इकडे राज्यात काँग्रेस (Congress) नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारित कायदे करण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

चव्हाण यांनी  अजित पवारांना लिहिलेले पत्र :

केंद्राने नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे आणि शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण यांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. अजित पवार हे राज्याच्या कृषी कायदा सुधारणाविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. त्या कायद्यांमुळे तिथले शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुधारित कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारावी, अशी मागणी चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.

अन्य राज्यांच्या कृषी कायद्यांत काय तरतूद?

१. कृषी मालाच्या खरेदीचे करार आणि व्यवहार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीने करण्यास प्रतिबंध घालणे.
२. शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार आणि व्यवहारांसाठी शेतकऱ्यांची संमती अनिवार्य करणे.
३. फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे.
४. शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करणे.
५. व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही, यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे.
६. कृषी मालांच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव आणि ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रदान करणे.

वरील तरतुदींच्या आधारे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारित कायदे करावे, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

ही बातमी पण वाचा : चिंता करु नका, आमचे अजितदादा खंबीर – निलेश लंके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER