कोल्हापूरच्या गोकुळचे राजकारण दिल्लीपर्यंत घुमले

कोल्हापूर :  गोकुळ मल्टीस्टेट करण्याबाबत माजी आमदार मालेराव महाडिक व पी एन पाटील यांनी संचालक मंडळाची बैठक गुरुवारी घेतली. बैठकीत उपस्थित सर्व संचालकांनी एकमुखी मल्टीस्टेट ला पाठिंबा दिला. त्याच वेळी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्री गिरिराज सिंह यांना गोकुळचा मल्टीस्टेट चा प्रस्ताव नामंजूर करावा असे निवेदन दिले. तर आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी मल्टीस्टेट विरोधातला लढा सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड ( गोकुळ) ने मल्टिस्टेट करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाकडे अहवाल पाठविला आहे. गोकुळ मल्टिस्टेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ती केलेली नाहीत, सभेचा अजेंडा व इतर कागदपत्रे यामध्ये तफावत आहे. यासर्व बाबींची शहानिशा करावी, मल्टिस्टेटचा निर्णय करु नये अशा मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंग यांना गुरूवारी दिले.

गोकुळ ही प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संघटना म्हणून काम करते. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध फेडरेशन लिमिटेड (महानंद) गोकुळ संघराज्य संस्था आहे. जिल्ह्यात कोणतीही सरकारी डेअरी संस्था कार्यरत नाही. सरकारी दुग्धशाळा म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. ज्यासाठी महाराष्ट्र राज्याने गोकुळला आपली जमीन दिली आहे आणि त्यास कार्यान्वित करण्यासाठी अनुदान दिले आहे. हे मुद्दे विचारात न घेता आयुक्त – सहकारी व उपनिरीक्षकांना कोणतीही माहिती न देता, सरकारकडून परवानगीशिवाय मल्टिस्टेटचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविला आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मल्टिस्टेटबाबत बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांना बोलण्याची संधी दिली नाही. सहकारी संस्थांचा प्रतिनिधी सभेला अनुपस्थितीत होता. सभास्थळ मुद्दामहून अपुऱ्या जागेत ठेवले. याबाबत सभासदांनी आक्षेप नोंदविले आहेत. गोकुळ होती कोल्हापूरचे राजकारण फिरणार असून त्याचा आवाज आता दिल्लीपर्यंत घुमला आहे.