औरंगाबादचे राजकारण फिरते धर्म आणि जातींभोवतीच 

Aurangabad Vidhan Sabha

औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा असून यावेळी भाजपा शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध एमआयएम असा संघर्ष होईल. एमआयाईमचा संपूर्ण जिल्हाभर प्रभाव नसला तरी किमान सहा मतदारसंघांमध्ये लक्षणीय मते घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाभोवती येथील राजकारण फिरते. त्यामुळेच विकास हा मुद्दा आजपर्यंत गौण ठरत आला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अतुल सावे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल. एमआयएमचे डॉ. गफार कादरी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकतील. या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज राजेंद्र दर्डा यांचा गेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता यावेळी ते निवडणूक लढणार नाहीत.

औरंगाबाद मध्य मतदार संघाचे प्रतिनिधित्व एमआयएमचे इम्तियाज जलील करीत होते. ते आता खासदार झाले आहेत. त्यामुळे एमआयएमकडून नवीन चेहरा दिला जाईल. शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा प्रदीप जयस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची लढत काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा एमायएमशी असेल.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार कल्याण काळे यांना मिळेल हे जवळपास निश्चित आहे. वयाची पंचाहत्तरी पार केलेले बागडे यांना भाजपने डावलले तर जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांना संधी मिळू शकते. चव्हाण यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता आहेत. त्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या.

सिल्लोड हा काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला. पण सत्तार यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आणि या मतदारसंघात नवेच समीकरण तयार होताना दिसत आहे. सत्तार यांच्या विरोधात मराठा समाज एकवटेल अशी शक्यता दिसत आहे. त्यातच सत्तार यांना आजपर्यंत मोठ्या प्रमाणात मिळालेली मुस्लिम मते एमआयएमच्या उमेदवाराने काही प्रमाणात खाल्ली तर सत्तार यांना निश्चितच धोका होऊ शकतो. या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पालोदकर परिवाराला मानणारे पंधरा ते वीस हजार मतदार ही त्यांची ताकद आहे. त्यांचे वडील माणिकराव पालोदकर मंत्री होते.

वैजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर आमदार आहेत. त्याठिकाणी शिवसेना माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांना रिंगणात उतरवू शकते. कन्नडमध्ये विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव हे 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते पण गेली लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढविली. त्यांनी दोन लाखावर मते घेतल्यानेच शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आता शिव बहुजन पक्ष असा स्वतःचा पक्ष हर्षवर्धन जाधव यांनी तयार केला असून जिल्ह्यातील सहा विधानसभा जागा लढण्याची घोषणा केली आहे. कन्नडमध्ये त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी आमदार नितीन पाटील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष नामदेव पवार यांना संधी मिळू शकते. गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर मराठा समाज त्यांच्या विरोधात एकत्र यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.