पोलीस उपअधिक्षकाने लैंगिक सुखाची मागणी केल्याचा पोलीस उपनिरीक्षक महिलेचा आरोप

sex psi

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाकडे साताऱ्यातल्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप संबंधित महिला पोलिसाने शुक्रवारी (ता. 29) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला.

महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे या सातारा जिल्ह्यातील पाटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांना एका विनयभंगचे गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासंदर्भात कागदपत्रांवर सही करण्याकरिता भेटण्यास गेल्या. त्यावेळी जाधवर यांनी शारिरिक सुखाची मागणी केली. गुन्ह्यातील आरोपींसोबत तडजोड करुन पैसे न दिल्याने शिवीगाळ केली, असा धक्कादायक आरोप शिंदे यांनी केला. सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे याप्रकरणी दाद मागीतली असता, त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ करत केनने फटके मारुन केबीन बाहेर काढले, असाही आरोप शिंदे यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट होता : जयाप्रदा

शिंदे यांनी सांगितल, की त्यांची नेमणूक पाटण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर झाल्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये अंगद जाधवर व पाटण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उत्तम भापकर यांनी संगनमत करुन अधिकाराचा दुरुपयोग केला. माझा मानसिक, शारिरिक व आर्थिक छळ केला. एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात हजर करण्याकरिता छाननी अहवालावर उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी जाधवर यांनी मला प्रश्न विचारला, की संबंधित गुन्ह्यातील आरोपीकडून किती रुपयाची तडजोड झाली. त्यातील माझा हिस्सा मला आज देणे अपेक्षित आहे. त्यावर मी कोणाकडुनही एक रुपया घेतला नसल्याने मी पैसे कोठुन देवू, असे विचारले. यावर जाधव यांनी अतिशय अश्लिल भाषेत बोलत ‘तसेच तु बघ आता मी तुझी काय हालत करतो?’ अशी धमकीही दिली. याप्रकरणी मी तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीकडे प्रकरण दिल्यानंतर समितीच्या चौकशीत अंगद जाधवर यांनी अपशब्द वापरल्याचे स्पष्ट झाले मात्र, त्यांच्या विरोधात कोणती कारवाई न करता माझी बदली सातारा नियंत्रण कक्षात केली. सातारा पोलीस अधीक्षक पदावर तेजस्वीनी सातपुते रुजू झाल्याने, त्यांच्याकडे पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विरोधात लेखी तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी गेले होते. पण त्यांनी तक्रार ऐकून न घेता उलट मलाच चिडून ‘तुच अश्लिल चाळे केले असणार, तुला घरी कसे बसवायचे, काय रिपोर्ट बनवायचा असे मला माहित आहे असे म्हणत, टेबलावरील केन उचलून त्याने सपासप तीन-चार फटके मारुन धक्के मारुन मला केबिन बाहेर काढले. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर अँट्रोसिटी, विनयभंग व अधिकाराचा दुरुपयोग या कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधीत प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. यासंदर्भातील कागदपत्रातून वस्तुस्थिती समोर येईल. यामुळे वेगळी प्रतिक्रीया देण्याची गरज नसल्याचे सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : स्मृती इराणी बद्दल अश्लाघ्य विधान जयदीप कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल