पीडितेशी आरोपीने विवाह केल्याने ‘पॉक्सो’ खटला सहमतीने रद्द

Kerala High Court - POCSO Act

एर्णाकुलम : ज्या १७ वर्षांच्या मुलीवर आरोपीने  वारंवार बलात्कार केला तिच्याशीत त्याने नंतर विवाह केल्याने केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) दोघांच्या सहमतीने आरोपीवरील ‘पॉक्सो’ (POCSO) खटला रद्द केला.

मुख्य म्हणजे त्रिसूर येथील ‘पॉक्सो’ न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी व पीडिता यांच्यात दिलजमाई झाली व त्यांनी विवाह केला. त्यानंतर या आरोपीने विवाह आणि सहमती यांचे पुरावे सादर करत केरळ उच्च न्यायालयात खटला रद्द करण्यासाठी याचिका केली. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीवर खटला दाखल झाला होता. पण खटला मागे घेण्यास आपली हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र पीडित मुलीच्या वडिलांनीही उच्च न्यायालयात सादर केले.

या बदललेल्या परिस्थितीचा विचार करून खटला रद्द करण्याचा आदेश देताना न्या. पी. हिरालाल यांनी म्हटले की, पीडितेशी आरोपीने विवाह केला असल्याने आरोपीवरील खटला चालवून काहीही साध्य होणार नाही. खटला जरी चालविला गेला तरी त्यात पीडिता व तिचे वडील हे अभियोग पक्षाचे मुख्य साक्षीदार असतील. पण आता झालेली सहमती पाहता हे दोन्ही साक्षीदार अभियोग पक्षाला साथ दणार नाहीत हे उघड आहे.

न्यायमूर्तींनी म्हटले की, अशा  प्रकरणांमध्ये न्यायालयांनी व्यवहार्य दृष्टिकोन ठेवायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटले आहे. त्यामुळे खटला रद्द करणे हे या आता विवाहित असलेल्या दाम्पत्याच्याही हिताचे आहे. शिवाय खटला रद्द केल्याने सार्वजनिक हितासही कोणतीही बाधा पोहोचण्याची शक्यता नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button