
सोलापूरः कोरोनाच्या महासंकटात पोलीस परीवारापासून अंतर राखून दिवस रात्र आपले कर्तव्य बजावीत आहेत. मात्र त्या रक्षकांनाच जीवानिशी जावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कधी कोरोनासारख्या आजाराने तर कधी कोणाच्या मनमानी कारभारामुळे.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांना प्रवासासाठी परवानगी मिळू लागली आहे. वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गाव, शहर, जिल्ह्या्च्या सीमेवर पोलीस तैनात आहेत. चेकपोस्ट नाक्यावरून तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अहोरात्र झटत आहेत मात्र, पोलिसांना चक्क त्यांच्या प्राणालाच मुकावे लागणे गंभीर आहे.
सोलापूर येथील विजयपूर रोडवरील वडकबाळ चेकपोस्ट नाक्यावर पिकअप गाडी ने पोलिसाला उडविले. व उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी भरधाव वेगात येणा-या एका वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करणे त्याच्याच जीवावर बेतले आहे. त्या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३०, रा. भवानीपेठ, सोलापूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. या घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तातडीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व मृत पोलीस कर्मचा-याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेऊन वाहनासह चालकाला ताब्यात घेतले. गौस नबीलाल कुरेशी (वय ३१, रा. पाच्छा पेठ, सोलापूर) असे वाहनचालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. सोलापूर-विजापूर महामार्गावर वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथेही नाकेबंदी केंद्र आहे. येथे पहाटे पाचच्या सुमारास विजापूरकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात बोलेरे पिकअप वाहन येत असल्याचे पाहून, तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ते वाहन इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वाहनचालकाने वाहन न थांबविता तसेच भरधाव वेगाने पुढे नेले. त्या वाहनाचा क्रमांक पूर्णपणे मिटलेला होता, वाहनामध्ये चालकासह अन्य एक व्यक्ती देखील होती, पाठीमागे लाकडी फळ्या बांधलेल्या होत्या. त्यातून प्रवासी वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे पोलीस नाईक रामेश्वर परचंडे व गृहरक्षक जवान जीवन देशमाने यांनी त्या वाहनाचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. पुढे काही अंतरावर समशापूर ते नंदूर रस्त्यावर पोलीस नाईक रामेश्वर परचंडे यांनी त्या वाहनाला अडविले. परचंडे हे मोटारसायकलवरून खाली उतरून पुढे येत असताना त्या वाहनचालकाने वाहन सुरू करून परचंडे यांना जोराची धडक मारून खाली पाडले. नंतर त्यांच्या अंगावरून वाहन नेऊन त्यांना गंभीर जखमी केले. व वाहनचालक सुसाट निघून गेला.
या घटनेनंतर अन्य पोलिसांनी तेथे धाव घेऊन जखमी परचंडे यांना सोलापुरातील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार घेतानाच पोलीस नाईक परचंडे यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शोध घेऊन वाहनचालक कुरेशी यास अटक केली. तसेच, त्याच्या विरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला