कोकणवासी तुम्हाला नक्कीच कोल्हापुरी चप्पल दाखवतील; दरेकरांचे मलिकांना प्रत्युत्तर

nawab malik - Pravin darekar - Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सतत तीन दिवस झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. या दौऱ्यावरून आता भाजप आणि सत्ताधारी आघाडीमध्ये जोरदार राजकारण रंगू लागलं आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार टीका केली. मलिकांच्या टीकेला आता दरेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

नवाब मलिक विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत विधान करतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक सांगतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसून राहायचे, यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. कोकणातील जनता तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणातील जनतेच्या मनात असल्याचे दिसून आले, अशा शब्दात दरेकर यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त असल्याचं म्हटलं. आम्ही वैफल्यग्रस्त असूही. पण आज कोकणची जनता चिंतेत गर्क आहे. त्यांची चिंता दूर करा. नाही तर कोकणच्या जनतेत जे वैफल्य येईल त्याने तुमची दाणादाण उडेल, हेच आमचं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, असा टोलाही दरेकरांनी लगावला. सरकारच्या करणी आणि कथनीत खूप मोठा फरक आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा म्हणजे ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते निघाले, अशा स्वरूपाचा झाल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला. एका बाजूला आमचा तीन दिवसांचा दौरा तर मुख्यमंत्र्यांचा तीन  तासांचा. त्यांच्या तीन  तासांच्या दौऱ्यावरही आम्हाला आक्षेप नसता; पण त्यांनी मदतीची घोषणा करायला हवी होती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांचा केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’; प्रवीण दरेकरांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button