पोपट कसं तरी करतोय…निपचित पडलाय…

Ajit Pawar - Bharat Bhalke - NCP - Editorial

Shailendra Paranjapeलहानपणी शालेय वयात काही वाक्प्रचार आणि म्हणी शिकवल्या जायच्या. त्यांचा वाक्यात उपयोग करून दाखवता आला म्हणजे त्यांचा अर्थ विद्यार्थ्याला समजला असे मानले जात असे. लोका सांगे तत्त्वज्ञान, आपण कोरडे पाषाण, ही अशीच एक म्हण. तिचा अर्थ असा की लोकांना तत्त्वज्ञान सांगणारेच त्याचा अंगीकार करत नाहीत, किंबहुना (मुख्यमंत्र्यांचा नव्हे खरा किंबहुना) हरताळच फासतात, असा या म्हणीचा अर्थ.

या म्हणीची आठवण यावी, असं वर्तन एरवी कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी केले आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेशही झाला. या कार्यक्रमाच्या वेळी झालेली गर्दी आणि त्यामुळे करोनाविषयक नियमांना फासला गेलेला हरताळ याबद्दल सर्वच टीव्ही वाहिन्यांनी गुरुवारी दिवसभर बातम्या दाखवल्या. भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आणि विचारले की आता मुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई करण्याची धमक दाखवणार का…

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी आपल्या मलबार हिलवरच्या जेतवन बंगला या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करताना केंद्र सरकारवर टीका केली आणि लशीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याबद्दलची आकडेवारीच जाहीर केली. त्यावेळी अजित पवार यांच्या सभेला झालेली गर्दी आणि होत असलेले नियमांचे उल्लंघन यावर विचारले असता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेले उत्तर मासलेवाईकच आहे. ते म्हणाले की अजित पवार हे लोकप्रिय नेते आहेत आणि पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते पंढरपूरला गेल्याने लोकांनी गर्दी केली. मात्र, करोनाच्या नियमांचे उल्लंघन या संदर्भात टोपे यांनी मौनच पाळले. दुसरीकडे अजित पवार यांनी स्वतः या विषयावर असं मत व्यक्त केलंय की करोनासंदर्भातले नियम पोटनिवडणूक असलेल्या ठिकाणी शिथिल करायला हवेत.

वास्तविक, करोनाची दुसरी लाट खूपच धोकादायक असल्याने आणि आता रोगाचा फैलाव हाताबाहेर गेलेला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध समाजघटक, विविध व्यावसायिकांच्या संघटना, चित्रगृहचालक मालक, नाट्यव्यवसायातले धुरिण अशा सर्वांशीच चर्चा करताहेत. संपूर्ण लॉकडाऊन लावावे की नाही, यासंदर्भात खलबतं सुरू आहेत. असं असताना अजित पवार मात्र पोटनिवडणुकीच्या ठिकाणी करोनाचे निर्बंध शिथिल करायला हवेत, अशी भाषा करताहेत, याला काय म्हणावे. लोका सांगे तत्त्वज्ञान, आपण ….असं नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं…

रोजच्या रोज राज्याच्या जनतेला आरोग्यविषयक डोस देणारे आरोग्यमंत्रीही करोनाच्या नियमांचे उल्लंघन अजित पवार यांनी केले असं न म्हणता अजित पवार कसे लोकप्रिय आहेत, याचेच गोडवे गात असतील, तर काय म्हणावे…रोजच्या रोज विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांना, धुरिणांना बोलावून करोना किती गंभीर आहे, हे सांगणारे मुख्यमंत्री स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांना करोना गंभीर आहे आणि तुम्ही कशाला कडमडायला पंढरपूरला गेलात आणि गर्दी जमवलीत, असं खडसावून विचारू शकत नाहीत, याला काय म्हणावे…

राज्याचे करोनाविषयक सल्लागार सुभाष साळुंके यांनी एका बैठकीत बिरबलाची गोष्ट सांगितली आणि लॉकडाऊन या शब्दाविषयी लोकांच्या मनात चीड असल्याने प्रत्यक्ष तसेच निर्बंध घालायचे पण लॉकडाऊन हा शब्द न वापरता, असं सुचवलं होतं. बादशहाला पोपट मेलाय हे कोण सांगणार, त्याऐवजी पोपटाने डोळे मिटलेत, पोपट कसा तरी करतोय, तो निपचित पडलाय, वगैरे सांगायचे पण तो मेलाय, असे म्हणायचे नाही. नाही तर आपलेच मुंडके उडवले जायचे.

तीच गोष्ट आज राज्यात घडतेय. राज्यात सरकार नावाची यंत्रणा मेलीय, असं म्हणायचं फक्त नाही. गृहमंत्री भुर्रकन उडून गेले, त्याआधी एका मंत्र्याला उडवले…सरकार निपचित पडलंय, ते डोळे वर करून पडलंय, ते कसं तरी करतंय पण मेलंय म्हणायचं नाही. आता सरकारचीच ही अवस्था असेल तर अजित पवारांवर कारवाई तरी कोण करणार….

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button