इंडोनेशियातील गुहेत सापडले ४५ हजार वर्षांपूर्वीचे रंगीत चित्र त्या भागातील मानवी वस्तीचा सर्वात जुना पुरावा

वॉशिंग्टन : पुरातत्व वैज्ञानिकांच्या एका चमूला इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील गुहेत किमान ४५ हजार वर्षांपूर्वी काढलेले एक रंगीत चित्र आढळून आले आहे. पृथ्वीच्या त्या भागातील मानवी वस्तीचा हा आत्तापर्यंतचा सर्वात जुना पुरावा मानला जात आहे.

गुहेतील मातीच्या भिंतीवर विटकरी रंगात (रेड ऑकर) काढलेले हे १५४ सेंमी लांब व ३४ सेंमी उंच एवढ्या आकाराचे पूर्णाकृती चित्र एका रानडुकराचे आहे. हे चित्र एवढे सफाईदार आणि कलात्मक पद्धतीने काढलेले आहे की त्यांत त्या रानडुकराच्या अंगावरील सरळ, दाट व राठ केसांचे पुंजके व त्याचे नाक आणि कपाळ यांच्यामध्ये असलेला सुळा सुस्पष्ट दिसतो. चित्रातील डुकराच्या पार्श्वभागापाशी मानवी हाताच्या पंज्याचे दोन ठसेही उमटविलेले आहेत. चित्रात दाखविलेले डुक्कर बहुधा कळपात उभे असावे, असे वाटते. कारण त्याच्या तोंडाकडील बाजूस इतर डुकरांच्या शरिराचे भागही अंशत: दिसतात.

सुलावेसी बेटावरील ज्या लेआंग तेदोग्ने गुहेत हे चित्र आढळले ती चुनखडीच्या उत्तुंग पर्वतकड्यांनी वेढलेली असून तेथून जवळचा रस्ता चालत एक तासाच्या अंतरावर आहे. त्या दुर्गम भागात फक्त उन्हाळ्यात जाणे शक्य होते. कारण एरवी तो सर्व भाग पुराच्या पाण्याने वेढलेला असतो. जे आजपर्यंत कधी पाश्चात्य लोकांच्या संपर्कातही आलेले नाहीत अशा ‘बुगिस’ या आदिम जमातीच्या खूप थोड्या लोकांची त्या भागात वस्ती आहे.

इंडोनेशियाच्या पुरातत्त्व खात्याचे काही अधिकारी व काही विद्यार्थी यांची तुकडी सर्वेक्षणासाठी गेले असता ‘पीएचडी’साठी अभ्या करणार्‍या  बुरहान या विद्यार्थ्यास हे चित्र गुहेत दिसले. या चित्राचा शोध सन २०१७ मध्ये लागला असला तरी त्याची सविस्तर माहिती  ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रथमच प्रसिद्ध झाली आहे.

गुहेतील हे चित्र किमान ४५ हजार वर्ष जुने आसावे असा नक्की अंदाज ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठाचे वैज्ञानिक प्रा. मॅक्झिम ऑबर्न यांनी लावला. प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात ते लिहितात की, गुहेत चित्राच्या वरच्या बाजूला जमा झालेल्या कॅल्शियमच्या थराचा मी ‘डेटिंग’ तंत्रज्ञानाने अभ्यास केला. त्यावरून तो थर किमान ४५ हजार वर्षे जुना असावा असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे हे चित्र किमान ४५ हजार वर्षांपूर्वी (किंवा कदाचित त्याच्याही आधी) काढलेले असावे, असे सहज म्हणता येते. पुरातत्वीय वस्तूंचे नक्की वय ठरविण्यासाठी जे वैज्ञानिक तंत्र वापरतात त्या ‘डेटिंग‘ म्हणतात. प्रा ऑबर्न  त्यातील तज्ज्ञ आहेत.

याआधीचे जे सर्वात जुने  दगडावर काढलेले चित्र मानले जायचे तेही वैज्ञानिकांच्या याच चमूने शोधले होते. तेही सुलावेसी वेटावरच आढळले होते. त्या चित्रात अर्धवट मानव व अर्धवट पशू अशी शरीररचना असलेल्या व्यक्तिंचा एक समूह एका मोठ्या आकाराच्या सस्तन प्राण्याची शिकार करताना दाखविलेले होते. ते चित्र ४३,९०० वर्षे जुने होते. सुलावेसी बेटांवरील माणूस गेली हजारो वर्षे रानडुकरांची शिकार करत आला आहे व विशेषत: हिमयुगापासूनच्या प्रागऐतिहासिक कलेमध्ये ते विषय चितारलेले दिसतात.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER