घरातले” घरपण” हरवलेले नटसम्राट

Father - Maharastra Today

सकाळीच व्हाट्सअप वर ची एक पोस्ट वाचली. छोटी गोष्ट होती ती .एका शांताराम अण्णांची. करी रोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते ते .सकाळी साडेसहाला घर सोडायचे, मग ओवर टाईम करून रात्री उशिरा घरी यायचे, आता रिटायर झालेले. मग चाळीतली खोली विकून डोंबिवली मध्ये वन बीएचके घेतला.

आता सकाळची वेळ होती आणि त्यांना जोरात प्रेशर आलेलं. ती वेळ म्हणजे मुलाची व नातवाची आवरायची घाई ! हळूहळू हे दुखणं रोजचं झालं .गावाकडे राहिल्यावर मोठ्या भावाला ही नोटांच्या पुडक्याची अपेक्षा आणि घरी परतल्यावर ,”राहणार होतात ना? इतक्या लवकर कसे परत ?” या मुलाच्या प्रश्नाने अशी चेहऱ्यावर वाचता येणारी वाक्य. आणि मग दररोजचे सकाळचे आवरण्यासाठी वाद .त्यातून टॉयलेटच्या म्हातारपणीच्या तक्रारी आणि एकदा मुलाचा उद्रेक झाला, पेपरही सकाळी अण्णांच्या हातात .”मी ऑफिसला गेल्यावर करा तुमची काम निवांत ! माझ्या वेळेला खोळंबा . माझी लोकल हुकते ती ! चांगली नोकरी केली असती तर रिटायर नंतर चांगली पेन्शन ,पीएफ, ग्रॅज्युएटी मिळाली असती. टू बीएचके फ्लॅट घेऊन देता एखादा ! फार्म हाऊस बनवता .एखादी होंडा सिटी घेतली असती ! मित्रांच्या वडिलांनी मी केलं हे सगळं त्याच्यासाठी. अण्णा तुम्ही काय केलत हो माझ्यासाठी ?”

या प्रश्नावर खिडकीकडे बघून अश्रु थोपवण्याचा प्रयत्न झाला. काय काय केलं त्याचा चित्रपट डोळ्यासमोर सरकला. नंतर बायकोने समजावून शांत केलं. सुनेला जाणीव होती तिने मुलाला आठवण करून दिली. शेवटी मुलाने माफी मागितली. ही गोष्ट होती म्हणून शेवट गोड झाला.

म्हणून वास्तवातलं कटू सत्य थोडीच गोड होतं ?

वि वा शिरवाडकर यांच्या नटसम्राट मध्ये कालिंदी सह ,”अहो कुणी घर देता का घर!” असे म्हणणारे अप्पा बेलवलकर सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. ती तर केवळ सुरुवात होती असं म्हणावं का ? आज घरात असूनही” घरपण हरवलेले नटसम्राट” बघितले की असं म्हणावसं वाटतं. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. किंबहुना तो शेवटचा पर्याय असतो त्यांच्याकडे. आणि मग आज विविध न्यायालयात प्रलंबित वर्षानुवर्षांचे खटले बघितले की वृद्धांची सहनशीलता किती ताणली गेली असेल याची कल्पना येते.

समुपदेशकाकडे असणारी गर्दी, वृद्धांच्या हेल्पलाइन्स चे सतत एंगेज असलेले फोन्स ! वृद्धाश्रमातील जागांसाठीची वेटिंग लिस्ट ,मानसिक व्याधीमुळे शारीरिक तक्रारी ओढवून घेतलेले वृद्ध हे सगळे हेच दर्शवतात. परदेशात जाताना ही घर सोडून उडालेली पाखरं परत वापस येणार नाहीयेत असा त्यांनी कधी विचारच केलेला नसतो .केवळ कधीतरी मुले येतील या वेड्या आशेवर अनेक वृद्ध आई-वडील सकाळी उठल्यावर महाभयंकर वाळवंटासारखा रूक्ष असा दिवस अंगावर आल्यासारखा काढतात. सकाळी उठून आता या एकटेपणाचा करायचं काय ? हा भीषण प्रश्न समोर उभा राहतो त्यांच्या.

खरं व्यक्ती व्यक्तिगणिक परिस्थिती वेगळी दृष्टिकोन वेगळा पण कोणत्याही शैक्षणिक व आर्थिक गटात आज आज “म्हातारपणाची काठी “हे गृहीतक मनात धरल जाते. आणि मग त्या अपेक्षांचा भंग होतो म्हणून वास्तव खूप कठीण वाटतं. वास्तवात अडचण ही एकटेपणाची आणि संवादाच्या कमतरतेची आहे. त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जमाखर्च म्हणजे मोठी पोकळी शिल्लक राहते.

एंजीओ कडून आणि समुपदेशनातून अनेक असे अनुभव येतात. घर माझ्या नावावर करून द्या म्हणून आपल्याच आई-वडिलांना खेळणारी मुले आहेत .म्हाताऱ्या व्यक्तींनी घरातून निघून जावे म्हणून कायद्याचा दुरुपयोगही केला जातो. अक्षरशः एका सुनेने सासू विरुद्ध छळाची तक्रार केली होती. पोलिस अटक करायला आल्यावर कुणीतरी पोलिसांना तातडीने बोलावले, तेव्हा असं लक्षात आलं की ती वृद्ध सासु अंथरुणाला अक्षरशः खिळलेली होती. खूप अशक्त झाली होती .कायद्याच्या दुरुपयोग केल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिल्यावरच तक्रार मागे घेतली गेली. पण या सगळ्यातून नातेसंबंध किती चांगले गेले असतील.

एका ठिकाणी तर असे बघण्यात आले की दोन मुले असलेल्या एका विधवेने मुलांना पोटगी मागणारी केस केली. खरंतर ती एक एक महिना एकेकाकडे राहत होती पण ती कुणालाच नको होती. सतत ती आपल्या आजारपणाच्या तक्रारी करायची. समुपदेशनाच्या निमित्त्याने ते सगळे एकमेकांसमोर आल्यावर लक्षात आलं ,की पोटगी ही तिची गरजच नव्हती तर खरी गरज होती, मुलांनी नीट प्रेमाने वागावे विचारपूस करावी काळजी घ्यावी हे स्पष्ट झाल्याने हळूहळू त्यांच्यातली कटुता निवळून कुटुंब एकत्र राहू लागले .आपल्याच विश्वात गर्क मुलामुलींनी यातून काही लक्षात घ्यावं आणि वृद्ध लोकांनीही लक्षात घ्यावं की त्यांची त्यांना कामे असतात .वाढीव अपेक्षा नकोत.

अनेकदा वृद्ध जेव्हा न्यायालयात जातात तेव्हा मुले प्रचंड दुखावली जातात. तर काही वेळा आई-वडील टोकाचे सहन करत राहतात केवळ मुलगा दुखावेल आणि दुरावेल म्हणून सुद्धा त्यांचे हात दगडाखाली अडकला प्रमाणे होतात. अनेक प्रश्न खूप जास्त पैसा असल्याने तर काही पैसा नसल्याने निर्माण होतात. कुठे कुठे वरिष्ठ वयाच्या आडमुठेपणाची पण त्यात भर पडते. फक्त पालक व मुले यांच्यातच नाही तर अनेक वृद्धांच्या घटस्पोटाच्या केसेस देखील असतात. आणि त्या पूर्ण विचारांती, पुरेसा वेळ घेऊन, निर्णय घेतलेल्या असल्यामुळे तडजोडीला फारसा वाव नसतो .लग्नाला चाळीस ते पन्नास वर्षे झालेले लोकही बरेच जण परस्परांना आयुष्यभर ओळखू शकलेले नसतात किंवा प्रेमही देऊ – घेऊ शकलेले नसतात. आणि मुले सुद्धा त्यांचे पटणारच नसेल तर हा निर्णय स्वीकारतात. किंबहुना त्यासाठी आग्रह धरतात. हे सगळं वास्तव आहे, भलेही ते कितीही कटू असू द्यात.

जनरेशन गॅप कायमच होती. पण ती आत्ताच एवढी रुंदावण्याची ही काही कारणे असू शकतात. नोकरी ,बढत्या, जास्त पैसे याने कदाचित समाधान हरवते आहे .एकटेपणा हा सामाजिक प्राणी असल्याने असह्य होतो आणि मग सोशल मीडियाद्वारे तो पूर्ण केला जातो. पण सोशल मीडिया वरून माणसांची असणारी गरज पूर्ण होत नाही.

पण काही गोष्टी मुद्दाम जाणीव ठेवून न सांभाळल्याने तर हे होत नाही याचा विचार करावा ? कधीतरी जाणीवपूर्वक वेळीच लक्ष न दिल्याने ह्या गोष्टी घडतात असे लक्षात येत आहे. आई-वडिलांनी स्पर्धेत पळण्यासाठी ,मला पाळणाघरात ठेवलं. आता आम्ही स्पर्धेत धावतोय ! त्यांना माझ्यासाठी वेळ नव्हता, तसा मलाही आता नाही ! त्यात काय एवढं .असं म्हणून आई-वडिलांना वृद्धाश्रमात ही पिढी ठेऊ शकते.

बरेचदा वरील पैकी कुठलीही चूक आपण न करता देखील, मुलांना पुरेसा वेळ देऊन, निगुतीने संगोपन करून देखील ही वेळ येऊ शकते. याला आजूबाजूचा परिसर, दिसणार्‍या गोष्टी, मिळणारा एक्स्पोजर या गोष्टी जबाबदार ठरू शकतात, काळाचा महिमा असावा का हा ? पण जे काही असेल ते !

परिस्थिती लवकर स्वीकारली तर त्रास कमी होतो. म्हणूनच या समस्या नाकारायलाच नको. त्यामुळे आपला स्वतःला होणारा त्रास देखील कमी होतो. आणि प्रश्न आहेत तिथे पर्यायही आहेतच. उत्तरे शोधणे सुरू झालेले आहेत. त्यासाठी वेगवेगळे सपोर्ट ग्रुप, डे केअर सेंटर, छंद जोपासणे, तब्येती नीट राखणे, फिटनेस टिकवणे जेणेकरून जगण्याचा आनंद घेता येईल आणि परावलंबित्व दूर राहील, आर्थिक तरतूद, इच्छापत्र करणे, दोघांनाही सगळ्या कायद्याचे, नियमांचे ज्ञान असणे हे सगळं आवश्यक आहे. थोडक्यात काय तर चांगल्याची इच्छा,अपेक्षा करून वाईटात वाईट जे वाट्याला येईल त्यासाठी तयार राहणे यातच खरा शहाणपणा आहे.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button